नवीमुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची दुर्गा फाउंडेशनची मागणी..

| प्रकाश संकपाळ / नवी मुंबई | कुळ कायद्याचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व नारायण नागु पाटील यांनी देशात पुकारलेल्या आंदोलनामुळे १९५७-६० या काळात कष्टकरी गरीब शेतकऱ्यांना ‘कसेल त्याची जमीन’ या कुळकायद्यानुसार जमिनीचा हक्क मिळवून दिला होता.

नवी मुंबईतीलआगरी, कोळी, कराडी, कुणबी व आदिवासी या समाजाचे शेती व मासेमारी हेच पारंपरिक व्यवसाय होते. कुळ कायद्यानुसार मिळालेल्या हक्काच्या जमिनी १९७० च्या दशकात शासनाने सिडकोमार्फत कवडीमोलाच्या बाजारभावाने संपादीत केल्या त्यामुळे नवीमुंबईतील प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले, पर्यायाने प्रकल्पग्रस्ताचे रोजगार, व्यवसाय, उत्पन्नाचे साधन नष्ट झाले. शासनाने सिडकोमार्फत प्रकल्पग्रस्ताना देशोधडीला लावले असताना नवी मुंबईतून तत्कालीन खासदार दि.बा.पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पुकारलेल्या आंदोलनाची व या आंदोलनात शेतकऱ्यांनी दिलेल्या बलिदानाची शासनाने गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्यात विकास योजना राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला.

प्रकल्पग्रस्ताना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार दि.बा. पाटील यांचे मोठे योगदान असल्यामुळे त्यांना प्रकल्पग्रस्ताचे कैवारी म्हणून संबोधले जाते.

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्ताच्या संपादित जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आलेल्या विमानतळास ‘दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात यावे अशी मागणी दुर्गा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा शोभाताई भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *