” नोटेवरून गांधींचा फोटो हलवून, मोदी स्वत:चा फोटो छापतील “

| मुंबई | पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर आणि विमानतळांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोटो बघायला मिळतो. फोटो छापण्याच्या स्पर्धेत मोदी फारच पुढे निघून गेल्याचं यावरुन समजतं. विशेष म्हणजे खादीच्या कॅलेंडरवरही महात्मा गांधींच्या ऐवजी मोदींचाच फोटो झापण्यात आला होता. हे सारं काही असंच चालत राहिल्यास नोटेवरुन गांधीचा फोटो हटवून मोदी स्वत:चाच फोटो छापतील, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

बंगालच्या लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो झापण्यात आल्यानं वादंग निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसनंही या घटनेचा तिव्र शब्दात निषेध केलाय. या घटनेचाच हवाला देत मलिक यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

बंगालमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांवर डोळा ठेवूनच सरकारनं असा प्रकार केल्याचा आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे.

निवडणूक आयोगानंही याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत. बंगालमधील निवडणूकीमुळे वातावरण तंग झालेलं असताना लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींच्या फोटो प्रकरणावर विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. निवडणूक आयोग आता या प्रकरणी काय कारवाई करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान मागील काही दिवसांआधीच निवडणूक आयोगानं निवडणूका जाहिर केलेल्या राज्यातील पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असलेले सर्व होर्डिंग्ज काढण्याचे आदेश दिले होते. या निर्णयानंतर आता लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटो काढण्याचे नवे आदेशही आरोग्य मंत्रालयाला देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *