आता गावा गावात साजरा होणार शिवस्वराज्य दिन, ग्रामविकास विभागाचा स्तुत्य निर्णय..

| मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये हा दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यासंदर्भातील सूचना ग्रामविकास विभागाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकर्‍यांना दिल्या आहेत.

जिल्हा मुख्यालय येथे पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल. पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमध्ये पदाधिकारी, अधिकारी, कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल. कोरोना प्रतिबंधाबाबत शासनाने जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करून हा दिन साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचार्‍यांनी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादन करावे व राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करून कार्यक्रम संपन्न करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे दरवर्षी सहा जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

मुश्रीफ म्हणाले, की रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार! शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठासही मन न दाखवणे, अशी आज्ञा देणारा इतिहासातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सतराव्या शतकात या महाराष्ट्रात भूमिपुत्रांचे हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केले. परकीय आणि स्वकीय अशा जुलमी सत्ताधीशांशी, वतनदारांशी अनेक लढाया, युद्धे लढून या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याची निर्मिती केली. जुलमी राजवटी संपुष्टात आणण्यासाठी सर्व जातीधर्माच्या अठरापगड बारा बलुतेदार, जिवाभावाचे मावळे एकत्र करून हा लढा दिला. अनेक किल्ले सर केले. जनतेसाठी कसे राज्य करावे याचा आदर्श निर्माण केला. आपल्या राज्यातील जनतेसाठी, शेतकर्‍यांसाठी अनेक वटहुकूम काढले. या महाराष्ट्रातील तमाम जातीधर्माचे लोक या स्वराज्याच्या कार्यात सामील झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *