पूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..

| मुंबई | महापुरामुळे चिपळूण आणि महाड येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. कधीही न भरून येणारे अभुतपुर्व नुकसान झाले आहे. सरकार मार्फत मदतकार्य सुरू असले तरी पुरग्रस्तांना तातडीची मदत तात्काळ मिळण्यासाठी तेथील शासकीय कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख आणि सरचिटणीस अविनाश दौंड यांनी मुंबईतील शासकीय कर्मचाऱ्यांना आवाहन केले असून या आवाहनाला उत्स्फूर्त उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पूरग्रस्त कोकणवासीयांना अन्न, औषधे, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू तातडीने पाठवण्यात येणार असून त्याचे वाटप स्थानिक सरकारी कर्मचारी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी दिली आहे.

दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे अशीच परिस्थिती उद्भवली होती तेंव्हा संघटनेने कपडे, भांडी आणि शालोपयोगी वस्तूंचे वाटप शंकराचार्य यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते अनिल लवेकर आणि वसंत डावरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते, अशी माहिती संघटनाध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी दिली. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे आदर्श नेतृत्व स्वर्गीय र.ग. कर्णिक यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार संघटना नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आली असून या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मुंबईतील सरकारी कर्मचारी निश्चितपणे भरघोस मदतनिधी जमा करतील असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख सरचिटणीस अविनाश दौंड कार्याध्यक्ष गुलाबराव पवार, कोषाध्यक्ष गणेश बकशेट्टी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *