पालघर बोईसर शहरांच्या मध्यावर ३७७ हेक्टर क्षेत्रावर वसणार नवीन पालघर शहर, सिडकोकडे याची सूत्रे..!

| पालघर | शहर निर्मितीचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सिडको महामंडळावर राज्य शासनाने आता पालघर नवीन शहर उभारण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार ३७७ हेक्टर जागेवर हे नवीन शहर उभारण्याची कार्यवाही सिडकोने सुरू केली आहे. प्रस्तावित नव्या शहरातील विकासाच्या संधी, बाजाराची स्थिती आदींचा आढावा घेण्याच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचारविनिमय करून विकासाचे एक आदर्श मॉडेल तयार करण्याची सिडकोची योजना आहे.

शहर निर्मितीत सिडकोचा हातखंडा आहे. नवी मुंबई हे याचे उत्तम उदाहरण आहे. सिडकोचा हा अनुभव लक्षात घेऊन राज्य सरकारने अलीकडेच स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यात नवीन शहर उभारण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविली आहे. पालघर आणि बोईसर शहराच्या मधोमध ३७७ हेक्टर क्षेत्रफळाच्या जागेवर हे अद्यावत नवीन शहर साकारले जाणार आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षकांचे कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत, नवीन प्रशासकीय इमारत, प्रेक्षागृह, शासकीय विश्रामगृह तसेच जिल्हा मुख्यालयातील किमान दहा टक्के कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान आदींच्या उभारणीची जबाबदारीही सिडकोवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालयाच्या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पालघर नवीन शहर प्रकल्प उभारणीच्या दिशेनेसुद्धा सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे.

प्रस्तावित नवीन शहराचा विकास नियोजनबद्ध व सर्वसमावेशक रितीने व्हावा यादृष्टीने आदर्श मॉडेल तयार करण्याचे काम सिडकोने हाती घेतले आहे. याअंतर्गत बाजाराचा कल, गुंतवणूकदारांची मानसिकता, खरेदीदारांच्या आपेक्षा आदींची चाचपणी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रस्तावित प्रकल्पाअंतर्गत जमिनीचा वापर, आवश्यक क्षेत्राची निवड, भाडेपट्ट्याच्या अटी, विकासाचे धोरण आदींबाबत औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचारविनिमय करण्याचा सिडकोचा इरादा आहे. त्याअनुषंगाने स्वारस्य अभिव्यक्ती अर्थात एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टचा मसुदाही प्रसिद्ध करण्यात आल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, पालघर नवीन शहर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर पालघर ते नवी मुंबई दरम्यान, दळवळण यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीनेसुद्धा सिडकोने चाचपणी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *