राज्यात बर्ड फ्ल्यू चा धोका वाढला..!

| मुंबई | बर्ड फ्ल्यूचा आजार हा अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यूदर हा १० ते १२ टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट घोषीत करणं गरजेचं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. जालना येथे आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

“देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या बर्ल्ड फ्ल्यूने थैमान घातलं असून महाराष्ट्रातही त्याचा शिरकाव झाला आहे. परभणी जिल्ह्यात शेकडो कावळे या आजारानं मृत्यूमुखी पडले आहेत. सुरुवातीला पक्षांमध्ये संसर्ग होणाऱ्या या आजाराचा मानवी शरिरातही संसर्ग होतो. या आजाराचा मृत्यू दर हा १० ते १२ टक्के आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने अलर्ट घोषीत करणं गरजेचं आहे,” असं टोपे यांनी म्हटलं आहे.

परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू :

परभणी जिल्ह्यात मुरुंबा गावात बर्ड फ्ल्यूमुळे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. मृत कोंबड्या या एका पोल्ट्री फार्ममधील आहेत. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी इतर कोंबड्यांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याचं महाराष्ट्र देशातील आठवं राज्य बनलं आहे.

राज्यात बर्ड फ्ल्यूची प्रकरणं समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेत या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत या आजाराची तीव्रता आणि एकूण परिस्थिती समोर येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *