रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन्स आणण्यासाठी दिल्यास संबंधित हाॅस्पिटलची कोविडची मान्यता काढण्यात येणार..!

| पुणे | जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा काही प्रमाणात कमी होत असून, अद्यापही काही हाॅस्पिटल रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन्स आणण्यासाठी प्रीस्क्रिप्शनस देतात. यामुळेच रेमडेसिविर इंजेक्शन्सचा काळाबाजार होत आहे. सध्या सर्व कोविड हाॅस्पिटल्सला थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून रेमडेसिविर इंजेक्शन्सचा पुरवठा होत असून, रुग्णांची गरज लक्षात घेऊन इंजेक्शन्सचा वापर करायचा आहे.

मेडिकलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध होत नसतानाही हाॅस्पिटल रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन्स आणण्यासाठी प्रीस्क्रिप्शनस देत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून हाॅस्पिटलने रेमडेसिविर इंजेक्शन्ससाठी प्रीस्क्रिप्शनस दिल्यास संबंधित हाॅस्पिटलची कोविडची मान्यता काढून घेण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

जिल्ह्यात गुरुवार (दि. १३) रोजी ६२३ कोविड हाॅस्पिटल्ससाठी ६ हजार १६६ रेमडेसिविर इंजेक्शन्सचे वाटप करण्यात आले. सध्या दररोज सरासरी ५ ते ६ हजार इंजेक्शन्स वाटप करण्यात येते असून काही प्रमाणात तुटवडा कमी झाला आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण ६२३ कोविड हॉस्पिटल्समध्ये असलेल्या १६,१४८ फंक्शनल बेडसच्या प्रमाणात ६,१६६ इंजेक्शनसचा पुरवठा हॉस्पिटलसला स्टॉकिस्ट मार्फत करण्यात आला आहे. दररोज प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे सर्व रुग्णालयांना त्यांच्या बेडच्या प्रमाणात औषध पुरवठा करण्यात येत आहे.

सदर बाबत असेही निदर्शनास आले आहे की, हॉस्पिटलमार्फत रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन विकत आणण्यासाठी प्रीस्क्रिप्शन देण्यात येते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते. हे इंजेक्शन सध्या बाजारात उपलब्ध नाही. परंतु रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन विकत आणण्यासाठी प्रीस्क्रिप्शन देण्यात आल्यामुळे त्याचा काळाबाजार होण्यास चालना मिळत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे कोणतेही हॉस्पिटलने रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन विकत आणण्यासाठी प्रीस्क्रिप्शन देण्यात देऊ नये. अशी बाब आढळून आल्यास संबंधीत हॉस्पिटल यांना केला जाणारा रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा गोठवण्यात येईल व कोविडची मान्यता काढून घेण्यात येईल, असा इशारा देशमुख यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *