सीमा लढ्यातील हुतात्मे स्व.मारुती बेंन्नाळकर यांच्या वारसांना सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आर्थिक मदत..

ठळक मुद्दे :

✓ डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून केली मदत..
✓ सोबतच महिनाभराचा शिधा केला सुपूर्द
✓ सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणार – शिंदे यांची ग्वाही

| बेळगाव | संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्मे झालेले स्व.मारुती बेंन्नाळकर यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मी बेंन्नाळकर यांना गेल्या काही महिन्यांपासून पेन्शन बंद असल्याच्या वृत्ताची सीमा भाग समन्वयक मंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तात्काळ दखल घेतली आहे. ठाण्यातील डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून हुतात्मा स्व.मारुती बेंन्नाळकर यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मी बेंन्नाळकर यांस आज 51 हजार रुपयांची थेट आर्थिक मदत करण्यात आली. यासोबतच फौंडेशनच्या माध्यमातून बेंन्नाळकर कुटुंबियास महिनाभराचा शिधा सुपूर्द करण्यात आला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी बेळगाव येथील स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांच्या समवेत आज कंगराळी येथील श्रीमती बेंन्नाळकर यांच्या घरी भेट देऊन ही मदत सुपूर्द केली.

सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सीमा भाग समन्वयक मंत्री म्हणून आपण कटिबद्ध आहोंत अशी ग्वाही मा ना श्री एकनाथजी शिंदे यांनी दिली. सीमा लढयात १९८६ साली स्वतः तुरुंगवास भोगल्याने आपली या लढ्याशी कायमस्वरूपी नाळ जोडली गेलेली आहे. या भावनेतूनच आपण सीमा भागातील मराठी बांधवांच्या सोबत असून नेहमीच सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासन दिले.

तर , कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा डॉ श्रीकांतजी शिंदे यांनी डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून बेळगाव आणि सीमा भागातील नागरिकांसाठी आरोग्यविषयक सर्वोतोपरी मदत करण्यात येत असल्याचे सांगितले. याअगोदर देखील डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून बेळगाव येथे एक सुसज्ज रुग्णवाहिका आणि ५ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन देण्यात आली आहेत. आवश्यकता असल्यास आणखी आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देखील डॉ श्रीकांतजी शिंदे यांनी यावेळी दिले.

यावेळी बेळगाव शिवसेना जिल्हाप्रमुख श्री प्रकाश शिरोळकर, माजी महापौर श्री मालोजी अष्टेकर संपर्कप्रमुख श्री अरविंद नागणुरी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे श्री दत्ता ( भाऊ ) जाधव यांच्या सहित बेळगाव येथील स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *