राज्यातील शाळा सुरू होणार..?

| मुंबई | कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून शालेय शिक्षणाचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. पण काही राज्यं मात्र या स्थितीतून हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

देशातील अनेक राज्यात योग्य ती काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात आल्या. राजधानी दिल्लीत देखील कालपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु अद्याप महाराष्ट्रातील शाळा कधी सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु माहिती शिक्षण राज्य मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी शाळा सुरू होण्यासंदर्भातील निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाईल, अशी माहिती दिली आहे.

राज्यातील शाळा दिवाळीपूर्वी सुरु होईल की दिवाळी नंतर सुरु होईल या संदर्भातला निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाईल. मात्र, त्यापूर्वी राज्याचे आरोग्य विभाग आणि कोरोनाच्या संदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या टास्क फोर्स सोबत चर्चा केली जाईल अशी माहिती शिक्षण राज्य मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिली आहे. राज्य सरकारचा शाळा सुरु करण्याबद्दल सल्ला मसलत करत असून शाळा दिवाळीनंतर सुरू करायच्या की आत्ताच सुरू करायच्या यासंदर्भात तज्ञांसोबत चर्चा करून येत्या दोन दिवसात निर्णय होणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले. त्यामुळे राज्यात शाळांच्या घंटा पुन्हा केव्हा वाजणार या बद्दलची उत्सुकता लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दोन डोस पूर्ण करण्यात येतील तशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्यावेळी शाळा सुरू होतील त्यावेळी शिक्षकांचं लसीकरण पूर्ण झाल्यामुळे पालक देखील निश्चित होतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

टास्क फोर्सच्या मते राज्यात शाळा नेमक्या कधी सुरू व्हायला हव्यात?

मुलांना संसर्ग होऊन त्यांना त्रास होऊ नये याचा विचार करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जातोय. शाळेत मास्क घालणे, सोशल डिस्टसिंग पालन करणे, शाळेत गर्दी होऊ नये यसाठी नियोजन करणे हे गरजेचं आहे. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व अॅडल्ट आहेत त्यामुळे त्यांचे लसीकरण होणं किमान गरजेचा आहे. मुलांना कोविड झाला तर तो सौम्य असतो, प्रौढांना जर त्याचा संसर्ग झाला तो गंभीर स्वरूपाचा असतो. त्यामुळे प्रौढांचा लसीकरण व्हायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *