शिक्षकांची उन्हाळी, दिवाळी सुट्टी रद्द..!

| पुणे | कोरोनामुळे शाळा बंद राहणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणे शिक्षकांना आता बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने अजूनही शिक्षकांच्या सुट्ट्या जाहीर केलेल्या नाहीत. या पार्श्‍वभूमीवर 1 मे ते 14 जूनपर्यंतच्या शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. ऑनलाइन शिक्षणात कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांवर बिनपगारीची कारवाई केली जाणार आहे.

राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच पहिल्या लाटेत सुरक्षित राहिलेले आता दुसऱ्या लाटेत कोरोनाचे बळी ठरू लागले आहेत. राज्यातील 70 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना (10 ते 15 वयोगट) कोरोनाची बाधा झाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर आता शाळा सुरुच केल्या जाणार नाहीत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, शिक्षणाच्या प्रवाहात ते टिकून राहावेत, विद्यार्थ्यांची गळती थांबावी या हेतूने आता शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्यांमध्येही अध्यापन करावे लागणार आहे.

त्यासाठी विस्ताराधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यांमध्ये संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. शासनाच्या स्वाध्याय उपक्रमाबरोबरच अन्य उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शाळा स्तरावर कोणत्याही प्रकारची ऑनलाइन चाचणी न घेता केवळ ऑनलाइन शिक्षण सुरु ठेवावे, अशा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अनेक शिक्षकांना कोरोना सर्व्हेची ड्यूटी देण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदा कोणत्याही शिक्षकांना शैक्षणिक कामातून सुट्टी मिळणार नाही, असेही शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

ठळक बाबी

✓ राज्यातील सर्वच शाळा पुढच्या शैक्षणिक वर्षातच परिस्थिती पाहून सुरु होतील
✓ रॅपिड ऍन्टीजेन टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षकांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक
✓ कोरोनामुळे शिक्षकांना मिळणाऱ्या वार्षिक 76 सुट्ट्या रद्द; दिवाळी, उन्हाळी सुट्टीतही करावे लागणार काम
✓ विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढेपाळली; गुणवत्ता वाढीसाठी उपचारात्मक अध्यापनावर भर देण्याचे आदेश
✓ ऑनलाइन शिक्षणात कामचुकारपणा नकोच; अन्यथा वेतनवाढ थांबविणे अथवा बिनपगारीची होणार कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *