यंदा तरी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार का? संघटना आक्रमक..!

| पुणे | कोरोनाचे कारण सांगत मागील वर्षी प्रशासनाने शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्या, या वर्षी ही बदल्यांचे भिजत घोंगडे पडले आहे. मात्र यामुळे दुर्गम भागात काम करणारे शिक्षक, शिक्षिका, आजारग्रस्त शिक्षक यांच्यावर मोठा अन्याय होत आहे. या बदल्या ऑनलाईन होत असल्याने यामध्ये कोरोना संसर्गाचा धोका नसल्याने सरकारने तातडीने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र दुर्गम क्रांती संघटना व प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन कराव्यात अशा आशयाचा शासननिर्णय ७ एप्रिल २०२१ मध्ये शासनाने प्रसिद्ध केला, त्यावर जवळपास महिना उलटून गेला तरी प्रशासनाने अद्याप काही कार्यवाही केली नाही. संबधित बदल्या ऑनलाईन होणार आहेत म्हणजे शिक्षकाने बदलीसाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर स्वतःच्या मोबाईलवरून अर्ज करायचा आहे, अर्ज केल्यानंतर त्याला OTP येईल. शाळा देण्याची संपूर्ण प्रक्रिया मानवी हस्तक्षेप शिवाय पार पडणार आहे, बदली झाली की रजिस्टर मोबाईलवर मेसेज येईल आणि बदलीच्या आदेशाची प्रत येईल, तो आदेश घेऊन शिक्षकाने जुन्या शाळेवरून कार्यमुक्त होऊन विहित कालावधीत नवीन शाळेवर रुजू व्हायचे आहे.

या प्रक्रियेमध्ये कोणत्याही शिक्षकाला कुठेही मुख्यालयात जाण्याची आवश्यकता नाही, असे असताना देखील वर्षानुवर्षे एकाच शाळेवर ठाण मांडून बसलेल्या शिक्षकांनी व त्यांच्या तथाकथित नेत्यांनी कोरोनामुळे बदल्या करू नये असा पत्रव्यवहार ग्रामविकास मंत्र्याशी केला असल्याचे दुर्गम क्रांती संघटनेने म्हटले आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कास्ट्राईब संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.
———————

दुर्गम क्षेत्रातील शिक्षक व महिला कित्येक वर्षांपासून डोंगरी भागात काम करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते बदलीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र लाल फितीच्या कारभारामुळे त्यांच्यामध्ये नैराश्याचे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्यावरील हा अन्याय दूर करावा व शिक्षकांच्या बदल्या तातडीने कराव्यात
… राहुल शिंदे ( राज्याध्यक्ष,महाराष्ट्र दुर्गम क्रांती संघटना)
—————-
दिव्यांग व विविध आजारांनी विकारग्रस्त असलेल्या शिक्षकांना त्यांच्या घराजवळ शाळा मिळाव्यात यासाठी बदल्या होणे आवश्यक आहे. काही संघटना ठराविक शिक्षक नेतेमंडळीच्या बदल्या होऊ नयेत यासाठी शासनाची दिशाभूल करीत आहेत. मात्र शासनाने या बदल्या तत्काळ न केल्यास कास्ट्राईब शिक्षक संघटनेमार्फत आंदोलन करण्यात येईल.
…. गौतम कांबळे ( राज्याध्यक्ष,कास्त्राईब शिक्षक संघटना)
————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *