डिसेंबर, २०२१ अखेरपर्यंत १०० टक्के कर वसुली करा; प्रभाग समितीनिहाय विशेष वसुली मोहिम राबविण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश…!

| ठाणे | मालमत्ता कर आणि पाणी पट्टी कर वसुलीचा वेग वाढविण्याबरोबरच येत्या डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत १०० टक्के वसुली करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे कडक निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सर्व सहाय्यक आयुक्त व कर निरीक्षक यांना दिले. दरम्यान प्रभाग समितीनिहाय विशेष वसुली मोहिम राबविण्यासोबतच वेळप्रसंगी कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी सर्व संबंधितांना दिले.

कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत बोलताना श्री. हेरवाडे यांनी मालमत्ता कर आणि पाणी पट्टी कर वसुलीचा आढावा घेतला. यावेळी माहे डिसेंबर अखेर वसुली १०० टक्के करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे सक्त निर्देश त्यांनी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले.

आज अखेर अंदाजे ३५५.४६ कोटी रुपये मालमत्ता कराच्या स्वरूपात वसुली झाली आहे. सदरची वसुली ही निर्धारित इष्टांकाच्या ४८ टक्केपेक्षा जास्त झाली आहे. जवळपास ५.४७ लक्ष मालमत्ता कराची देयके वितरित करण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या एकूण १७६ ब्लॉकमधील सर्वच नागरिकांनी मालमत्ता कर भरावा यासाठी प्रभाग समिती निहाय विशेष वसुली मोहिम राबविण्याच्या सूचना हेरवाडे यांनी सर्व अधिका-यांना दिल्या.

त्याचप्रमाणे ब्लॉकनिहाय थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्याकडून वसुली करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना देतानाच पहिल्या सहामाहीमधील थकबाकीदारांकडील वसुली करण्यावर भर देण्याबाबत हेरवाडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान अस्तित्वातील मालमत्तांची वसुली करण्याबरोबरच नवीन मालमत्तांची कर आकारणी करून तसे प्रमाणपत्र संबंधित कर निरीक्षकांनी सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. त्याचबरोबर वापरात बदल किंवा अनिवासी भाडेतत्वावरील कर आकारणीची कार्यवाही करण्याच्या सूचना हेरवाडे यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *