उजनीतून पाणी उचलण्याचा तो आदेश रद्द केला नाही तर सर्वात पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा मी देईन – आ.बबनराव शिंदे

| महेश देशमुख / सोलापूर | उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला उचलण्यावरून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षांतून या योजनेला विरोध सुरू झाला आहे. आज एका वृत्त वाहिनीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले की, माझ्या पक्षाच्या नेत्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील आ. संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे की, सोलापूरच्या हक्काचे पाणी इतर कुठे वळणार नसून त्यावर सोलापूरकरांचा हक्क आहे व शासनाने जो आदेश काढलेला आहे तो आम्ही रद्द करू असे स्पष्टपणे सांगितले आहे.

यावर बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, सध्या श्रेयवादावरून बरीच चर्चा होत आहे, राजकीय आरोप एकमेकांवर करत आहेत परंतु ही वेळ राजकारण करण्याची नाही.यावेळी जिल्ह्याच्या हितासाठी सर्वांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उजनी धरणामध्ये कोणत्याही प्रकारचे शिल्लक पाणी नाही. जिल्ह्यामध्ये दोन ते तीन पाळ्या देखील मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे त्यामुळे इंदापूरच्या योजनेला पुणे, पिंपरी-चिंचवड शहराचे सांडपाणी द्यायचे असेल तर ते पुण्याजवळच उचलून नजीकच्या खडकवासला कॅनल मध्ये टाकून द्यावे त्यास आमचा विरोध असण्याचे काही कारण नाही मात्र जर कोणी उजनीतून पाणी नेणार असेल तर आम्ही जनतेच्या सोबत राहू.

जर शासनाने उजनीतून पाणी उचलण्याच्या आदेश रद्द केला नाही तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वप्रथम मी आमदारकीचा राजीनामा देईन अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी घेतली.

” जर निर्णय रद्द नाही केला तर जिल्ह्यात सर्वात अगोदर न्यायालयात जाण्याचा इशारा मी स्वतः शासनाला दिला होता. आणि जर पुढील काळात आदेश रद्द नाही केला तर मी माझ्या जिल्ह्यासाठी सर्वप्रथम आमदारकीचा राजीनामा देईन. “
– आमदार बबनदादा शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *