विशाळगडाच्या दुर्दशेकडे, अनधिकृत बांधकामांकडे लक्ष द्यावे, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीची पुरातत्व खात्याकडे मागणी..!

| पुणे | विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरवस्था, तसेच या संदर्भातील विविध घडामोडींच्या संदर्भात पुणे येथे पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांची २३ मार्च या दिवशी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ने भेट घेतली आणि निवेदन दिले.

कृती समितीने उपस्थित केलेल्या अनेक सूत्रांवर साहाय्यक संचालकांनी ‘निधी नाही, मनुष्यबळ अपुरे आहे’, अशी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. यानंतर कृती समितीचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी पुराव्यांसह अतिक्रमणांविषयी माहिती दिल्यावर साहाय्यक संचालक निरूत्तर झाले. ‘गडावर झालेले अतिक्रमण आणि मंदिरांची दुरवस्था यांविषयी सर्व संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई होण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू’, असे श्री. सुनील घनवट यांनी सांगितले.

या वेळी श्री गौड ब्राह्मण समाजाचे श्री. मनोहरलाल उणेचा, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे श्री. मुकुंद मासाळ, ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे प्रवक्ते श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि श्री. कृष्णाजी पाटील उपस्थित होते.

१. प्रारंभी साहाय्यक संचालकांनी ‘गडावर काही खासगी मालमत्ता आहेत. त्यावर अतिक्रमण झाले आहे, तसेच यावरील जमिनी वनखात्याकडे येतात’, असे सांगून दायित्व झटकण्याचा प्रयत्न केला. यावर श्री. घनवट यांनी ‘विशाळगड वर्ष १९९८ मध्ये पुरातत्व विभागाकडे आल्यावर नंतर होणारे कोणतेही बांधकाम विभागाची अनुमती घेऊनच करणे अपेक्षित असतांना ते कसे काय झाले ? त्या वेळी कारवाई का झाली नाही ?’ असे विचारले. त्यावर साहाय्यक संचालक काही उत्तर देऊ शकले नाहीत.

२. बाजीप्रभु देशपांडे यांच्या स्मारकाच्या जुन्या पायर्‍या दाखवून ‘आम्ही स्वच्छता करत आहोत’, असे सांगून बोळवण करण्याचा साहाय्यक संचालकांनी प्रयत्न केला.

३. ‘शासनाकडून निधी संमत झाल्यावर गडावरील समाधी आणि मंदिरे यांची डागडुजी करू. ही डागडुजी करण्यासाठी कुणी स्वयंसेवी संस्था सिद्ध असल्यास आम्ही ‘ना हरकत’ देण्यास सिद्ध आहोत’, असे सांगून पुरातत्व विभागाने दायित्व झटकण्याचा प्रयत्न केला.

४. या संदर्भात कोल्हापूर येथील पालकमंत्र्यांचे पत्र प्राप्त झाले असून शुक्रवारच्या बैठकीत आम्ही कोल्हापूर येथे सूत्रे मांडू, असे साहाय्यक संचालकांनी सांगितले.

५. पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी नियमितपणे गडाला भेट देणे, तसेच अतिक्रमण हटवणे आणि अन्य गोष्टींसाठी कालमर्यादा ठेवून प्रयत्न करणे अपेक्षित आहे, अशी मागणी श्री. सुनील घनवट यांनी या वेळी केली.

लोकांनी गडावर येऊन पहावे, असे पुरातत्व विभागाने गेल्या २२ वर्षांत गडावर काय केले ? – सुनील घनवट यांचा परखड प्रश्‍न

‘शिवछत्रपतींचा अमूल्य असा इतिहास असणार्‍या विशाळगडावरील समाधी, मंदिरांची दुरवस्था आणि ऐतिहासिक वास्तूंकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष यांमुळे गेल्या २२ वर्षांत पुरातत्व विभागाने लोकांनी गडावर येऊन पहावे, असे नेमके काय केले ?’, असा परखड प्रश्‍न सुनील घनवट यांनी उपस्थित केला.

‘रेहानबाबा दर्ग्याच्या परिसराच्या सुशोभिकरणासाठी ५ लाख रुपये, तसेच दर्ग्याकडे जाण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा रस्ता करण्यासाठी ५ लाख रुपये असा एकूण १० लाख रुपयांचा व्यय होतो’, असे श्री. घनवट यांनी सांगितले. त्यावर पुरातत्व विभागाने ‘यासाठी आम्ही एन्.ओ.सी. दिली नाही’, असे सांगितले. यावर श्री. घनवट यांनी ‘हे धक्कादायक आहे’, असेही श्री. घनवट यांनी या वेळी सांगितले.

याबाबत मराठीमाती प्रतिष्ठान, ठाणे यांच्याकडून देखील महाराष्ट्राचा पर्यटन विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *