येत्या विधानसभेंच्या निवडणुकीत भाजपला झटका लागण्याची शक्यता, हा आहे त्या पाच राज्यांतील विधानसभांचा सर्व्हे..!

| नवी दिल्ली | चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचं पानीपत होताना दिसत आहे. टाइम्स नाऊ आणि सी-व्होटरच्या सर्व्हेनुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचं सरकार येणार असून तामिळनाडूत काँग्रेस आघाडीची सत्ता येणार आहे. तर केरळात पुन्हा एकदा डाव्यांचंच पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे या तिन्ही मोठ्या राज्यांमध्ये भाजपला मोठ्या पराभवाला समोरे जावे लागणार आहे.

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू या चार राज्यांचा एक सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार केरळमध्ये लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. एलडीएफला एकूण 140 जागांपैकी 82 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर युनायटेड ड्रेमोक्रॅटिक फ्रंट 56 जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे. तर भाजपला केवळ एक सीट मिळण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूत काँग्रेस

तामिळनाडूत सत्तांतर होण्याचे संकेत मिळत आहेत. अन्नाद्रमुखच्या नेतृत्वाखालील आघाडीला 65 जागा मिळणार आहेत. तर डीएमकेच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडीला 158 जागा मिळण्याची शक्यता आहे. यूपीए आघाडीत काँग्रेसही असल्याने राज्यात डीएमकेच्या नेतृत्वात सत्ता येण्याचे संकेत मिळत आहेत. पुद्दुचेरीत मात्र एनडीएचं सरकार बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व्हेनुसार 30 जागांपैकी एनडीएला 16 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे.

आसाममध्ये भाजप सत्ता राखणार :

आसाममध्ये भाजपची पुन्हा सत्ता येण्याची शक्यता आहे. आसाममध्ये एनडीएला 126 पैकी 67 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र यूपीएही यावेळी चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. यूपीएच्या 39 वरून 57 जागा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतरांच्या पारड्यात दोन जागा जाण्याची शक्यता आहे. 126 जागा असलेल्या आसाम विधानसभेत बहुमतासाठी 64 जागांची आवश्यकता आहे.

पुन्हा ममता दीदी :

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना सोडून त्यांचे अनेक सहकारी जात असले तरी बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचंच सरकार येणार असल्याचं चिन्हं आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना 154 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 107 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला 211 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या. सर्व्हेनुसार राज्यात टीएमसीची सत्ता येणार असली तरी त्यांच्या सीट कमी होताना दिसत आहेत. तर भाजपला प्रचंड फायदा होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *