पृथ्वीराज बाबांचे मुख्यमंत्र्यांना अभ्यासपूर्ण पत्र..!| सातारा | माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाऊनच्या काळात कोणत्या उपाययोजना करायला हव्या आहेत त्यासंदर्भात सविस्तर पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहले आहे. त्यामध्ये हातावर पोट असणारे व शेतकरी यांच्या प्रश्नासंह वैद्यकीय, स्वस्त धान्य वितरण, कृषी अर्थ व्यवस्था तसेच परदेशात व कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी यांच्या प्रश्नांचा समावेश आहे.

कोरोनापासून खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने लॉकडाऊन तीन मे पर्यंत वाढवला आहे. तरीसुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा बघता लॉकडाऊन कधी संपेल किंवा किती वाढवला जाईल हे सांगता येत नाही. या परिस्थितीत राज्यातील काही महत्वाचे घटक आहेत त्यांचा पोटापाण्याचा, रोजगाराचा प्रश्न आहे.

अशांना सरकारतर्फे काही मदत व्हावी यासह अन्य मागण्या पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमत्र्यांकडे केल्या आहेत. कोरोना टेस्टिंगबद्दल स्पष्ट निर्देश द्यावेत, टेस्टिंगचा खर्च कोण करणार त्याबद्दल स्पष्टीकरण दिले जावे, टेस्टिंगचा सर्व खर्च महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट केला जावा व तसे सुस्पष्ट आदेश देण्यात यावेत. खाजगी डॉक्टरांना व खाजगी दवाखान्यांना जिल्हयाधिकार्‍यांमार्फत पीपीई किटचे द्यावे. केंद्राने रॅपीड टेस्टींग बंद केले आहे. त्यावर कार्यवाही व्हावी. धान्य घेताना लाभार्थीना पॉसमशीन मध्ये बोटांचा ठसा उमटला नाही तर त्यांना धान्य दिले जात नाही. परंतु शासनाचे धान्य हे मशीनचा वापर न करता दिले पाहिजे. त्याची कार्यवाही व्हावी. बाहेरच्या राज्यातील किंवा जिल्ह्यातील मजुरांकडे शिधा पत्रिका नसल्यास त्यांना अंत्योदय योजनेप्रमाणे तीन महीने धान्य दिले जावे.

त्याचबरोबर त्यांना आधार कार्डवर बांधकाम मजुरांप्रमाणे महिना दोन हजार भत्ता द्यावा. शेतकर्‍यांनी मागील कर्जाचे हफ्ते न दिल्यास त्यांना नवीन कर्ज द्यावे, खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना खाते व बियाणे यांचा पुरवठा करावा, कापूस खरेदी यंत्रणा मजबूत करावी व शेतकर्‍यांना हमीभावाची खात्री द्यावी, आरबीआयने हफ्ते व व्याज भरण्याकरिता तीन महिन्याची मुदतवाढ दिली आहे. ती सहकारी पतसंस्था व विकास संस्था सेवा सोसायट्यांनाही लागू करावी. राष्ट्रीयीकृत बँकांचे व सहकारी बँकांची कर्जे तीन महिन्यांवरून सहा महिन्यापर्यंत मुदत वाढवावी तसेच सहा महिन्यांचे व्याज केंद्र शासनाने भरण्याची विनंती करावी

तसेच केबल कंपन्यांना विनंती करून केबल कंपन्यांचे दर पुढील तीन महिन्याकरिता कमी करण्यात यावेत, वायफायची व्यवस्था ही आज जीवनावश्यक गरज झाली आहे. त्यांचे दर ही पुढील तीन महिन्याकरिता कमी करावयला सांगावे, परदेशात ५० हजारवर भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यापैकी पाच ते सात हजार महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत. त्यांचे जेवणाचे व राहण्याचे हाल चालले आहेत. त्यांना विमानाने भारतात परत आणण्यासाठी केंद्राशी संपर्क साधावा. कोटा राजस्थान येथे हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी जातात, त्यात महाराष्ट्रातील दोन हजावरवर विद्यार्थी आहेत. त्यांना परत आणण्यासाठी विशेष बसेस पाठवाव्या. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे व शेतकरी यांचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत. त्याचा विचार करुन निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी पत्राव्दारे केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *