शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा : पुष्प १ ले – आदिवासी बोलीभाषेतून कातकरी मुलांचे भविष्य बोलके करणारा जादूगार श्री. गजानन जाधव, रायगड…!

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षण कूस बदलत आहे. पारंपरिक हेकेखोर पद्धतीना तिलांजली देवून बोलक्या भिंती, मन प्रसन्न करणारे वातावरण आणि दर्जेदार शिक्षणाची हमी देणारे एकविसाव्या शतकातील कौशल्य विकास आणि एकूणच जगाला जोडणाऱ्या प्राथमिक शाळा पाहता, यात तिथे काम करणाऱ्या शिक्षकांचा वाटा सर्वाधिक मोठा किंबहुना त्यांच्यामुळेच ते शक्य झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ५ स्पटेंबर शिक्षक दिन या दिवशी शिक्षकांबद्दल उपकृत होण्याचा प्रयत्न समाज करत असतो. परंतु त्याहून अफाट काम करणाऱ्या या शिक्षक रत्नांची त्यांच्या आभाळाएवढ्या कामाची अल्प माहिती सर्वांसमोर यावी त्या दृष्टीने दैनिक लोकशक्ती ४ सप्टेंबर पासून १५ सप्टेंबर पर्यंत ‘ शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा ही लेखमाला सुरू करत आहोत. यातून असामान्य काम करणाऱ्या प्रेरणादायी अवलियांची गोष्ट आपल्या सर्वांसमोर मांडत आहोत. 
नक्की वाचत रहा..!
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा
 
पुष्प पाहिले : आदिवासी बोलीभाषेतून कातकरी मुलांचे भविष्य बोलके करणारा जादूगार श्री. गजानन जाधव, रायगड…!
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो, रोहा तालुक्यात सुगम, दुर्गम व अति दुर्गम क्षेत्रात शाळेची विभागणी केली आहे. रोहा तालुका ठिकाणापासून २३ किमी अंतरावरील अति दुर्गम क्षेत्रातील चिंचवली तर्फे आतोणे जिल्हा परिषदेच्या शाळेत ३ मे २०१९ पासून शिक्षक म्हणून काम करत आहे. या शाळेची पूर्व परिस्थिती सांगायची तर ही शाळा अति दुर्गम क्षेत्रात तर आहेच परंतु गेल्या ४ वर्षांपासून या शाळेला इमारत नाही, ही शाळा एका आदिवासी वाडीतील समाज मंदिरात भरते. ना तेथे शौचालय आहे ना किचन सेड ना मुलांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था. कोकणात ४ महिने पावसाळा असतो अशा स्थितीत या छत गळक्या मंदिरात, बिन खिडक्यांच्या मंदिरात मुलं अनेक अडचणींनाचा सामना करत शिक्षण घेत होते व आहेत. पावसाचा जोर वाढला तर मुलांना दुपारचे जेवण ही उभे उभे घ्यावे लागते, संपूर्ण विद्यार्थी संख्या ही कातकरी आदिवासी समुदायाची व स्थलांतराचे प्रमाण खूप अशा परिस्थितीत एका छोट्या समाजमंदिरात ५७ मुलं शिक्षण घेत होते. अशा शाळेत विनंती बदलीच्या माध्यमातून एका नवीन आव्हान पेलण्यासाठी शाळेत रुजू झालो.
 
१७ जून २०१९ ला नवीन सत्राची सुरवात झाली व एका नवीन प्रवासास सुरवात झाली गेल्या १४ वर्षांपासून कातकरी बोलीभाषिक मुलांना अध्यापनाचा अनुभव पाठीशी होताच त्यामुळे बराच अंशी नवीन ठिकाणी याचा उपयोग होईल याची खात्री होती. जून पासून नवीन माझ्या सोबत शाळेवर श्रीम हर्षा काळे या शिक्षिका सोबत होत्या त्या ही नवीनच शाळेवर हजर झालेल्या, शाळा एका वाडीवरील समाज मंदिरात भरणारी त्याच मंदिरात हनुमानाची मूर्ती, तेथेच ५९ विद्यार्थी, २ शिक्षक, वरून पडणारा पाऊस, खिडक्यांना झापडे नव्हती अशा परिस्थितीत कामाची सुरुवात केली. पण कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने महिला शिक्षकाला तेथे काम करणे सोयीचे नसल्याने प्रशासनाने त्यांना केंदीय शाळेत पाठवले व तेथील उपक्रमशील शिक्षक जगन्नाथ अब्दागिरे यांनी स्वतःहून अशा परिस्थितीत काम करण्याची तयारी दर्शवली मग माझा व त्यांच्या प्रयत्नाने आमच्या मंदिरातील शाळेचा प्रवास सुरु झाला.
 
• परिस्थितीशी चारहात :
 
शाळेला इमारत नाही, एक छोटे गळके मंदिर, शौचालय नाही, शालेय पोषण आहार  शिजवण्यासाठी खोली नाही, एकाच मंदिरात ५९ मुलं, २ शिक्षक त्यात मारुतीच्या दर्शनासाठी येणारे भक्त, कोसळणारा मुसळदार पाऊस , गळणारे मंदिर अशा स्थितीत मुलांना शाळेत टिकवणे आमच्यासाठी खूप मोठे आव्हान होते. पण आम्ही ठरवलं होतं प्रत्येक मुलं शाळेत आलं पाहिजे व टिकले पाहिजे यासाठी १००% योगदान देण्याचे ठरवले होते. जमेल तसे मंदिराची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला उघड्या खिडक्यांना, दरवाज्याला प्लास्टिक लावले, शेजारच्या घरातून लाईट घेतली व शाळेतील जुने प्रोजक्टर सुरु केले व मुलांना आनंददायी वातावरणात शिक्षण कसे देता येईल याचे नियोजन केले.
 
• बालरक्षकच्या भूमिकेतून :
 
गेल्या ४ वर्षापासून बालरक्षक चळवळीत जोडला गेल्यामुळे जेथे समस्या तेथे काम करण्याची प्रेरणा या बालरक्षक चळवळी मुळे मिळत गेली व प्रत्येकमुल शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची सवय लागली. या ठिकाणी ही अनेक समस्या होत्या सतत गैरहजर, स्थलांतर, शिक्षणाबद्दल पालकांची उदासीनता, बोलीभाषा, शाळा इमारत नसणे अशा अनेक कारणांमुळे मुलं शाळेत येत नव्हते. पण मी व माझे सहकारी शिक्षक बालरक्षक असल्यामुळे बदल घडवायचा या हेतूने काम सुरवात केली दररोज पालकांच्या भेटी घेणे, घरी जाऊन मुलांना शाळेत घेऊन येणे, पालक सभा घेऊन शिक्षणाचे महत्व पटवून देणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सतत गैरहजर मुलांच्या घरी भेटी देणे, स्थलांतरित होऊन जाणाऱ्या पालकांचे समुपदेशन करणे अशा वेगवेगळ्या मार्गाने जाऊन प्रत्येक मुलं शाळेत कसा येईल यासाठी प्रयत्न सुरु केले. कधी कधी मुलांना नदीवर जाऊन घेऊन आलोत तर कधी घरच्या छोट्या भावंडाची सोय शाळेत करून त्या मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले. अशा प्रकारे स्वतःतील बालरक्षक वेळोवेळी जागृत करून मुलांना आहे त्या परिस्थितीत शिक्षण देण्याचा प्रयत्न केला व मुलांना प्रवाहात टिकवले. या वर्षी १० कुटुंबाचे प्रबोधन करून १० ते १२ मुलांचे स्थलांतर रोखण्यात यश आले व ते मुलं आज दररोज न चुकता शाळेत येतात. जे मुलं शाळेत यायच कंटाळा करायचे तेच मुलं आज शिक्षक शाळेत येण्याच्या आगोदर शाळेत हजर असतात हे सर्व बालरक्षकच्या भूमिकेतून केलेल्या कार्यामुळे आज दररोज मुलं न बोलवता शाळेत हजर असतात.
 
• बोलीभाषेतून शिक्षण :
 
शाळेतील ५८ विद्यार्थी हे कातकरी बोली भाषिक असल्याने त्यांच्या बोली भाषेची दोस्ती करणे महत्वाचे होते. मुलांना जेवढं स्वभाषेत शिक्षणाची आवड निर्माण होते तेवढे माध्यम भाषेतून होत नाही हे १४ वर्षाच्या अनुभवातून सांगावे वाटते. सेवेत २००६ साली लागल्या पासून आज पर्यन्त कातकरी बोली भाषिक मुलांसोबत राहिल्याने खूप अनुभव आला. इयत्ता पहिलीत दाखल होणारे मुलं हे पूर्णपणे आपल्या बोलीभाषेत संवाद साधत असते त्या मुलांना जर शिक्षणाच्या प्रवाहात टिकवायच असेल तर त्यांच्या भाषेतून संवाद साधणे खूप गरजेचे असते तोच विचार करून कातकरी बोलीभाषेत साहित्य बनवल. कातकरी मराठी शब्दकोश, बडबडगीते, गोष्टी यांच्या माध्यमातून मुलांना बोलत करण्याचे काम केले व जिल्हा परिषद रायगड ने याच साहित्याचे शिक्षक मार्गदर्शिका रुपात पुस्तक निर्मिती केली ,की रायगड जिल्ह्यातील १२०० कातकरी बोलीभाषिक विद्यार्थी असणाऱ्या शाळेपर्यंत साहित्य पुरवले. यामुळे औपचारिक शिक्षणाची सुरवात करणाऱ्या कातकरी बोलीभाषिक मुलांना समजून घेण्यासाठी शिक्षकांना मदत होत आहे. सध्या माझ्या शाळेतील मुलांशी मी एकरूप होताना मला कातकरी बोलीभाषेचा खूप उपयोग होतो त्यामुळे मुलांशी एक भावणीकतेचे व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले त्याचा परिणाम आज मुलं शाळेत रमू लागली आहेत.
 
• कलात्मक शिक्षणावर भर :  
 
प्रत्येक मुलं वेगळा असतो प्रत्येक मुलात वेगवेगळी कला दडलेली असते याला बालवयात प्रोत्सहान दिले तर ते अधिक बहरत जात असते त्या प्रमाणे माझ्या शाळेतील रांनपाखरामध्ये अनेक उपजत कला होत्या, त्यांना वाव देण्याचे काम केले जेणेकरून शाळेत फक्त अभ्यास नसून आपल्यातील विविध गुणांना संधी दिले जाते हे मुलांच्या मनात रुजल होत. त्या दृष्टिकोनातून दर शनिवारी दप्तराविना शाळा भरवून त्यांना आठवड्यातील शनिवार फनीवर वाटू लागेल असे वातावरण बनवले. कधी मातीकाम, कधी चित्रकला, कधी ठसेकाम, कधी टाकाऊ पासून कलाकृती तर कधी नृत्य, गायन, कसरतीचे व्यायाम, गलोल स्पर्धा आयोजित करून त्यांच्या कलागुणांना वाव दिला त्यामुळे शाळेची उपस्थिती वाढली व मुलांना शाळेची आवड निर्माण झाली व जे मुलं दर वर्षी स्थलांतर होऊन जात होते ते आपोआप रोखले गेले.
 
• समाजमंदिराचे ज्ञानमंदिरात रूपांतर : 
 
शाळेचे भौतिक वातावरण आनंददायी असेल तर मुलांना त्या ठिकाणी रमायला आनंद वाटतो पण ज्या ठिकाणी कुठलीच सुविधा नाही अशा ठिकाणी इच्छा असून ही मुलं यायला कंटाळा करतात, अशामुळे मुलांना शाळेत टिकवणे अवघड असते. अशीच स्थिती माझ्या शाळेची होती गळके मंदिर, खिडक्यानां झापडं नाहीत अशा स्थितीत समाज मंदिरात बदल करायचं ठरवलं, मग सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळेच्या उपक्रमांना दाद मिळत गेली.. कुठलीही भौतिक सुविधा उपलब्ध नसताना मुलांची शिकण्याची जिद्द, त्यांच्यातील कला, वेगवेगळ्या उपक्रमात त्यांचा असलेला सहभाग पाहून मुंबई मधील सम्पर्क संस्थेने मदतीचा हात पुढे केला व आमची चिंचवलीच्या समाज मंदिरात भरणाऱ्या शाळेला ज्ञानमंदिरात रूपांतर करण्यासाठी मदत केली. ज्या मंदिराच्या समोर एक पाऊल ठेवायला ही जागा नव्हती आज तेथे सुसज्ज असे २०×१० चे सेड उभारले गेले आहे, मंदिराला रंगरंगोटी केली आहे, मंदिरासमोर ओटी बांधली व तेथे आज दररोज मुलं शिक्षण घेतात, दुपारचे जेवण करतात एक हक्काचे छत मुलांना मिळाले आहे, तसेच स्वच्छता किट जेणेकरून मुलांना आरोग्याच्या चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत यासाठी साहित्य पुरवठा केला आहे. याच संस्थेच्या मदतीने मुलांसाठी पूरक आहार योजना लागू केली आहे. आठवड्यातून ३ दिवस मुलांना वेगवेगळी फळे, अंडी कधी चिकन, बिस्किटे, राजगिरा लाडू, खारीक असा पूरक आहार उपलब्ध करून देऊन मुलांमध्ये आनंददायी वातावरण तयार केले गेले आहे. आज या मंदिराचे पालटलेले रूप पाहून हे समाज मंदिर नसून ज्ञानमंदिर आहे असे वाटू लागले आहे. पूर्वी समाज मंदिरातील शाळेत दररोज यायला कंटाळा करणारी तेच मुलं या ज्ञानमंदिरात शाळा भरण्याच्या आगोदर येऊ लागली आहेत व मनसोक्त आनंददायी पद्धतीतने शिक्षण घेऊ लागली आहेत.
 
• निसर्ग चक्रीवादळात शाळा जमिनोदस्त :
 
 ३ जून ला कोकणात रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्री वादळाने तडाखा दिला व होत्याचे नव्हते झाले. हजारो संसार रस्त्यावर आले त्यात शाळा कशा अपवाद राहतील. माझी शाळा आगोदरच शेवटच्या घटका मोजत होती त्यात या निसर्ग
कहराने शाळा पूर्णपणे पडली व तोडका मोडका आधार पण नाहीसा झाला. पहिले कोरोनाचे संकट व आता निसर्ग चक्रीवादळाने पूर्ण पणे खचुन सोडले. प्रश्न होता आता मुलांचे शिक्षण जसे सुरु ठेवायचे.
 
• कोरोना काळातील ऑफलाईन शिक्षण :
 
मार्च पासून कोरोनाने कहर सुरु केला व शाळा बंद कराव्या लागल्या त्यात मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरवात केले पण माझ्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलाकडे ह्या सुविधा उपलब्ध नसल्याने, कोणत्याही पालकांकडे मोबाईल उपलब्ध नसल्याने तेथे online शिक्षण शक्य नव्हतं त्यामुळं मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून आम्ही ऑफ लाईन शिक्षणाचा विचार केला. मुलांचे गट पाडून त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार स्वाध्याय पुस्तिका बनवून त्यांच्या घरी, झोपडीवर जाऊन त्यांना शिक्षण देण्याचे ठरवले. हे करत असतात मास्क, सेनेटायझर, सुरक्षित अंतर ठेवून आठवड्यातून ३ दिवस असे नियोजन केले व मुलांचे ऑफ लाईन शिक्षण सुरु ठेवले. कधी माळावर, डोंगरावर मुक्त शिक्षण देऊन त्यांना अनौपचारिक शिक्षणातून त्यांना बोलत केलं. सध्या तरी शाळा कधी सुरु होतील हे सांगणे शक्य नाही त्यामुळे मुलांना अनुभवातून, परिसरातून शिक्षण कसे देता येईल याचा विचार करत आहोत. या कामात माझे सहकारी शिक्षक जगन्नाथ अब्दागिरे यांची मोलाची साथ असल्याने असा प्रतिकूल परिस्थितीत अनुकूलता आणण्यासाठी सतत प्रयत्न सुरु आहेत..सुरू राहतील..!
 
– गजानन जाधव, उपक्रमशील आणि प्रेरणादायी शिक्षक..!
 
 
✓ अवलिया शिक्षक परिचय : 
 
श्री.गजानन पुंडलिकराव जाधव
मुख्याध्यापक, रायगड जिल्हा परिषद शाळा चिंचवली तर्फे आतोणे,
ता.रोहा, जि.रायगड
📧- gajanan.jadhav1984@gmail.com
📱- 9923313777
 

1 Comment

  1. तुमचे कार्य प्रेरणादायी आहे.मी पण आमच्या मुलांसोबत त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *