राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय ऑगस्ट महिन्यापासून सुरू करावीत..!
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी..!

| मुंबई | १५ जून ला राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत. आज सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. कोरोनाची धास्ती सर्वानाच लागून राहिली आहे. अशा भयावह वातावरणात शाळा सुरू करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळच म्हणावा लागेल. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना सर्वात प्रथम विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन पुढील निर्णय घेणे योग्य ठरेल, असे मत उपाध्यक्ष प्रकाश बडगुजर यांनी व्यक्त केले.

राज्यातील रेड झोन क्षेत्रात तर कोरोना विषाणू ने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय परिस्थितीचा अंदाज घेऊन ऑगस्ट महिन्यातच उघडण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई ची मागणी असल्याचे विभाग संघटन युवराज कलशेट्टी सर यांनी सांगितले.

आज दिनांक २८.०५.२०२० रोजी महाराष्ट्रातील रेड झोन क्षेत्रातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय ऑगस्ट महिन्यापासून सुरू करणेबाबत विनंती निवेदन मा.मुख्यमंत्री, मा.शिक्षण मंत्री, मा.शिक्षण आयुक्त आणि कोकण विभाग शिक्षक आमदार श्री. बाळाराम पाटील सर यांना देण्यात आल्याची माहिती महिला विभाग संघटक सौ. उषा भालेराव यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानापेक्षा त्यांचा जीव जास्त महत्त्वाचा आहे. शैक्षणिक नुकसान पुढील काही दिवसांत भरून काढतील येईल परंतु कोरोणाची लागण होऊन जर विद्यार्थ्यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन रेड झोन क्षेत्रातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय हे ऑगस्ट महिन्यातच सुरू करण्याचा आमच्या मागणीचा शासनाने सहानुभूीपूर्वक विचार करावा अशी विनंती मुंबई सचिव श्री.अलीम सय्यद यांनी केली.

आज मा. शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी १५ जून २०२० रोजी शाळा सुरू करणार नाही असे सांगितले आहे. तरी रेड झोन क्षेत्रातील परिस्थिती सामान्य होईपर्यंत राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरू करू नये, या मागणीवर महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई आजही ठाम आहे. आमची मागणी मान्य होईपर्यंत याबाबत आपला पाठपुरावा आणि प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे मुंबई अध्यक्ष श्री. तानाजी कांबळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.