धक्कादायक : महात्मा गांधीच्या पुतळ्याची विटंबना, अमेरिकन राजदूतांची माफी..!

| नवी दिल्ली / मुंबई | अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान ही घटना घडली. वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे. काही असामाजिक तत्वांकडून या पुतळयाची विटंबना करण्यात आली. युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणी अमेरिकेनं माफी मागितली आहे.(Defamation of Mahatma Gandhi statue)

“वॉशिंग्टन डीसीमध्ये असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची काही असामाजिक तत्त्वांकडून विटंबना करण्यात आली ही अतिशय दु:खद घटना आहे. आम्ही याबाबत खेद व्यक्त करतो. तसंच या प्रकरणी माफी मागतो,” अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे भारतातील राजदुत केन जस्टर यांनी दिली.

दरम्यान, अमेरिकेत सुरू असलेल्या हिंसाचारावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षे डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसंच ज्या ठिकाणी विरोधकांची सत्ता आहे त्याच ठिकाणी अधिक हिंसाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.(Defamation of Mahatma Gandhi statue)

जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर फक्त अमेरिकेतच नव्हे तर जगभरात निदर्शनांच्या माध्यमातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेत होणाऱ्या आंदोलनांचे स्वरुप उग्र, हिंसक आहे. व्हाईट हाऊसबाहेर आंदोलन सुरु असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बंकरमध्ये आसरा घ्यावा लागला होता. पॅरिस, सिडनी, अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडा आणि न्यूझीलंड यांसारख्या ठिकाणी तर नागरिकांनी रस्त्यावर उतरुन आपला निषेध नोंदवला.

नेमकं काय आहे जॉर्ज फ्लॉयड प्रकरण ?

जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा सोमवारी मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. अधिकाऱ्याने जॉर्ज फ्लायड यांना अटक करताना त्यांच्या मानेवर गुडघा ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अमेरिकेत शुक्रवारपासून आंदोलनं सुरु आहेत.(Defamation of Mahatma Gandhi statue)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *