प्रस्तावित २२ जूनचे पावसाळी अधिवेशन लांबणीवर पडण्याची चिन्हे..!

| मुंबई | कोरोना संसर्गाचा फटका राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियोजनानुसार २२ जूनपासून प्रारंभ होणारे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.

सोमवारी (दि.१८) कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारी रोजी सुरू झाले होते. ते २० मार्चपर्यंत चालणार होते. मात्र,  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघात असावेत आणि प्रशासनावर अतिरिक्त ताण नको म्हणून अंतरिम अर्थसंकल्प मांडल्यानंतर लगेच १४ मार्च रोजी म्हणजेच एक आठवड्यापूर्वीच अधिवेशन गुंडाळण्यात आले होते. 

सभागृह संस्थगित केल्यानंतर झालेल्या घोषणेनुसार २२ जूनपासून मुंबईत पावसाळी अधिवेशन आयोजित केले जाणार होते. हे अधिवेशन ३ आठवड्यांचे होणार होते.

दरम्यान,  कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात कायम आहे. त्यात ३० जूनपर्यंत देशात श्रमिक व विशेष रेल्वे खेरीज कोणत्याही रेल्वे गाड्या चालवल्या जाणार नाहीत. त्यामुळे विधिमंडळाचे सदस्य अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्या पार्श्वभूमीवर सोमवारच्या बैठकीत अधिवेशनासंदर्भात चर्चा होईल.  कोरोनोला अटकाव करण्यासाठी सरकारने मोठा खर्च केला. यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. एकंदरित अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची अधिकची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *