विशेष लेख – कोरोना संकट नि कोरोना काळातील शासकीय योजना..!देशात कोणतीही आपत्ती आली तरी त्यात अधिक भरडला जातो तो गरीबच. कोरोना संकटा पूर्वीही अनेक संकट आपल्या देशावर आली. त्या संकट काळात जास्त आपत्तीत सापडला तो गरीब कष्टकरी वर्ग. आज करोना संकटात पायपीट करून प्रवास करतो तो गरीब मजूर. या महामारीच्या काळात, एकमेकांमध्ये योग्य अंतर ठेवण्याच्या काळात बँकेतील पैसे काढण्या साठी लांबच लांब रांगा लावतो तो गरीब कष्टकरी. स्वस्त धान्य दुकानात धान्य खरेदी करण्यासाठी रांगा लावत गरीब मजूर. जेव्हा जेव्हा देशावर काही संकटे येतात तेव्हा देशातील गरीब जनतेला त्याचा फटका बसतो. जेव्हा नोटबंदी सारखी आपत्ती राष्ट्रावर आली होती. तेव्हा सुद्धा बँके मध्ये गरीब जनताच जुने पैसे बदलून नवीन नोटा घेण्यासाठी गर्दी करत होती. बँके बाहेरील लांबच लांब रांगामध्ये अनेकांनी मृत्यूला सुद्धा ओढवून घेतले होते.

या आहेत कोरोना पार्श्वभूमीवरील सरकारच्या योजना:

कोरोना महामारीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार कडून देशातील व राज्यातील जनतेचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून देशवासियां साठी पुढील योजनांची घोषणा करण्यात आली.
▪️ केंद्र सरकार चे एक लाख 70 हजार कोटीचे पॅकेज.
▪️ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तीन महिन्यासाठी ५० लाखाचा विमा कवच.
▪️ पंतप्रधान अन्न कल्याण योजनेची घोषणा या योजने अंतर्गत १०किलो गहू, १० किलो तांदूळ ,एक किलो दाळ तीन महिने मोफत धान्य दिले जाणार.
▪️ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार रुपये .
▪️रोजगार हमी योजनेच्या प्रत्येक मजुरांच्या खात्यावर २ हजार रुपये टाकणार.
▪️रोजगार हमी योजनेंतर्गत रोजच्या मजुरीत १८२ रुपयावरून २०२ रुपये पर्यंत वाढ करण्यात येणार.
▪️ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांगांना १ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात येणार.
▪️ जनधन खाते असलेल्या महिलांना तीन महिन्यापर्यंत पाचशे रुपये जनधन खात्यात अनुदान म्हणून जमा करण्यात येणार.
▪️दारिद्रयरेषे खालील कुटुंबांना, उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस वितरित झालेल्या कुटुंबीयांना तीन महिने मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार.
▪️नोंदणीकृत बांधकाम मजुरांच्या बँके खात्यात २ हजार रुपये जमा करण्यात येणार.
▪️शहरी व ग्रामीण भागातील गरीब स्थलांतरित मजुरांना अन्नपुरवठा करणार
▪️बचत गटांना १० लाखाचे कर्ज २० लाख करण्यात आले.

अशा विविध प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या. करोना महामारीच्या या कठिण काळात ह्या आर्थिक घोषणा देशातील गरीब जनतेला दिलासा देणारी बाब आहे. परंतु या योजनांचा लाभ घेताना लाभ घेणाऱ्या व्यक्तीपर्यंत या योजना सहज पोहोचविण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. करोना सारख्या आजारावर रामबाण उपाय म्हणजे Social distancing…! परंतु या शासकीय योजनांचा लाभ घेताना social distancing चे तीन-तेरा वाजवताना दिसतात. शासनाने बँकेत जमा केलेली रक्कम काढण्यासाठी बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. बँकेत होणारी गर्दी बघता आपल्याला आपल्या देशात करोनारुपी राक्षस मुक्तपणे वावरत आहे. यावर विश्वासच बसत नाही. हीच परिस्थिती स्वस्त धान्य दुकानात आहे.

गर्दी टाळण्यासाठी बॅंका व रेशन दुकानात नियोजन कसे असावे…

बँकेत व स्वस्त धान्य दुकानात होणारी गर्दी सहज टाळता येऊ शकते. आजच्या डिजिटल युगात आधार कार्डचा वापर करून POS पेमेंट मशिनच्या साह्याने कुठून ही सहज पैसे काढता येतात. त्यामुळे बँक व्यवस्थापकांनी आधार कार्डचा वापर करून POS मशीन द्वारा पैसे काढण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. पाच-दहा गावाचा एक गट तयार करून बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या गावातच बँकेतून पैसे काढण्याची व्यवस्था करुन दिल्यास बँकेच्या ग्राहकांना लांबून बँकेत येण्याची गरज पडणार नाही. बँकेत गर्दी होणार नाही. हे सहज शक्य आहे. त्याच प्रमाणे स्वस्त धान्य दुकानात धान्य खरेदी करणाऱ्या पेक्षा वाटप करणाऱ्यांची अधिक गर्दी दिसते ती गर्दी आपण कमी करु शकतो. त्याचप्रमाणे आधी पासूनच सामाना ची पॅकिंग केल्यास स्वस्त धान्य दुकानातील गर्दी कमी करता येऊ शकते.

करोना महामारीपासून आपण वाचतो ते केवळ Social distancing ठेवून, घर बाहेर न निघता घरातच थांबून. त्यामुळे नागरिक कमीत कमी घराबाहेर कसे पडतील त्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेऊन करोना महामारीच्या काळातील सर्व शासकीय योजनांची माहिती सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवून त्यांनी स्वतः योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी त्यांची मदत करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करत आहोत. कष्टकरी, मजुर, गरीब जनतेला नेहमीच आपल्या अधिकारा बाबत माहिती नसते. ते आपल्या अधिकारा बाबद अनभिज्ञ असतात. त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करुन देणे हे आपल्या सारख्या सुजाण नागरिकांची ही जबाबदारी आहे व या लाॅकडाऊन च्या काळात आपण सर्वांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू..

– वितेश खांडेकर ( लेखक स्वतः संघटनात्मक तथा सामाजिक पातळीवर प्रत्यक्ष काम करणारे समाजसेवक आहेत..) 


5 Comments

  1. खूप छान दादा।मुद्देसूद आणि योग्य मांडणी

  2. खूप छान दादा।मुद्देसूद आणि योग्य मांडणी ।

  3. वास्तव आहे सर, गरिबाच्या गरिबीची हुबेहूब मांडणी.उपाशी मरण्यापेक्षा रोगाने मरण्यासाठी गरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांचा नाईलाज आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *