या वर्षाकरिता स्टूडेंट पोर्टल माहिती अद्ययावत कार्य प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत स्थगित करावे : पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी

| मुंबई | मा.शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या वतीने ऑनलाईन सरल प्रणाली द्वारे स्टूडेंट पोर्टल वरील सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता १ली ते १२ वी विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या माहितीवरुनच सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची इयत्ता ५ वी ते इयत्ता १०वी ची संच मान्यता सिस्टिम द्वारे ऑटो जनरेट ने तयार होत असल्याची माहिती विभाग संघटक श्री.नंदेश गवस यांनी दिली.

मार्च महिन्यापासूनच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद आहेत. अनेक विद्यार्थी, पालक मूळगावी गेले आहेत. त्यामुळे अनेक शाळांना इयत्ता ५वी च्या विद्यार्थी प्रवेशासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बहुतांश पालक आपल्या गावी गेल्याने तसेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात संचारबंदी असल्याने एकाच संस्थेतील प्राथमिक शाळेत इयत्ता ४थी ला पुरेसे विद्यार्थी असूनही इयत्ता ५वी साठी सदर विद्यार्थ्यांचे प्रवेश अजून झालेले नाहीत. तसेच कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे नवीन विद्यार्थी प्रवेश होण्यास अडचणी निर्माण होत असल्याची माहिती कोषाध्यक्ष श्री.हेमंत घोरपडे यांनी दिली.

स्टूडेंट पोर्टल वरील माहितीनुसार सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची इयत्ता ५वी ते १०वी ची संच मान्यता होणार असल्याने अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. म्हणूनच सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षा करिता स्टूडेंट पोर्टल वरील इयत्ता १ली ते ८वी विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याचे कार्य प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत स्थगित करण्याची मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई अध्यक्ष श्री. तानाजी कांबळे यांनी शासन दरबारी केली आहे. या संदर्भात मागणी करणारे विनंती निवेदन शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्त व मुंबई पश्चिम, उत्तर, दक्षिण विभाग शिक्षण निरीक्षक यांना पाठविल्याची माहिती श्री.तानाजी कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *