भयंकर: अजून एका शिक्षकाचा कोरोना संबंधित बळी, अडविल्याने चेकपोस्टवर ट्रकने चिरडले..!

गोविंद उगले, राज्य महासचिव, जुनी पेन्शन हक्क संघटन यांची प्रतिक्रिया..!
कोरोना आपत्ती विरुद्ध काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना पोलीस, आरोग्य कर्मचारी यांच्याप्रमाणे ५० लाखाचे विमासंरक्षण द्यावे व जे कर्मचारी या दरम्यान मृत्यू पावतात किंवा अपंगत्व येईल त्यांच्या कुटुंबांना तात्काळ अनुकंपा तत्वावर नोकरी तसेच कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करून त्यांच्या कुटुंबास संरक्षण देण्यात यावे, शासनाने यावर गांभीर्याने विचार करावा.

| सांगली | जत तालुक्यातील डफळापूर नजिकच्या चेकपोस्टवर पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतीस म्हणून ड्युटीवर असलेल्या एका शिक्षकाला चेकपोस्टवरून पळालेल्या भरधाव ट्रक चालकाने अंगावर ट्रक घालून चिरडले. त्यात  मदतनीस शिक्षक जागीच ठार झाला. नानासाहेब(पिंटू) सदाशिव कोरे वय- 36, रा.डफळापूर (शाळा कोळी वस्ती, डफळापूर)असे ठार झालेल्या शिक्षकांचे नाव आहे. तर पोलिस ऑपरेटर संजय बसगौंडा चौगुले हा यातून थोडक्यात बचावला आहे.  दरम्यान परवा ठाण्यातील शिक्षकाचा देखील कोविड सर्व्हे करून घरी परतत असताना अपघाती निधन झाले होते.

डफळापूर स्टँड जवळ मंगळवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. शिंगणापूर नजिकच्या चेक नाक्यावर हा शिक्षक नियंत्रण कर्मचारी म्हणून सोमवारी रात्रीच्या ड्युटीवर होता. या घटनेनंतर हणमंत रामचंद्र मुरड (वय ३७,रा.नाथाचीवाडी ता.दौंड जि.पुणे) (ट्रक नं.एम एच १२ एल डी ९७४९) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा डुबूले, डिवायएसपी दिलीप जगदाळे, पोलिस निरिक्षक राजाराम शेळके दाखल झाले असून याबाबत अधिकची माहिती घेत आहेत.

 धक्कादायक म्हणजे दैनिक लोकशक्तीला मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाने चेकपोस्टवर ट्रक न थांबवल्याने शिक्षक कोरे व पोलीस ऑपरेटर चौगुले यांनी त्याचा पाठलाग केला. ट्रक ला गाठून चालकाला खाली उतरण्यास सांगितले असता राग येऊन त्याने शिक्षक कोरे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडले.  यातून पोलीस ऑपरेटर चौगुले थोडक्यात वाचले आहेत.

दरम्यान , महाराष्ट्रात सगळीकडे शिक्षकांना अशी जोखमीची कामे विना प्रशिक्षण देत असल्याने शिक्षकांमध्ये घबराटीचे वातावरण असून त्यांना संरक्षण म्हणून ५० लाखांचा विमा लागू आहे की नाही याबाबत देखील संभ्रम आहे. ही घटना घडल्यानंतर  जुनी पेन्शन हक्क संघटनचे सांगली अध्यक्ष अमोल शिंदे यांनी याबाबत तीव्र खेद व्यक्त करत, संघटन सरांच्या कुटुंबासोबत असून त्यांना अनुकंपा व विमा मिळावा यासाठी सर्वोतोपरी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *