कोरोना युद्धात कोणतीही हयगय खपून घेतली जाणार नाही – पालकमंत्री एकनाथ शिंदे
अधिकाऱ्यांना भरला सज्जड दम, रुग्ण संख्या कमी करण्याचे आव्हान..!

| ठाणे | ठाणे जिल्ह्यातील मुंबईला लागून असलेली ठाणे महानगरपालिकेत सध्या कोविड-१९ रुग्णांनी हजारांचा टप्पा देखील पार केला आहे. त्या अनुषंगाने  काल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत त्यांच्याकडे अनेक आमदार आणि नगरसेवकांनी ‘मुंबई पॅटर्न’ ठाण्यात राबवावा अशी मागणी केली. ठाणे शहरामध्ये काल दिवसभरात तब्बल नवीन ९४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा हा १०९० इतका झाला आहे. 

कोरोना रुग्णांचा दिवसेंदिवस आकडा वाढतच जात असल्याने मुंबईमध्ये ज्याप्रकारे सात आयएएस अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातदेखील कोरोनाचा सामना करण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. एकूणच पालिका प्रशासन हा आकडा मर्यादित ठेवण्यात कमी पडत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी ही मागणी सर्वात आधी केली. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी त्याला पाठिंबा देखील दिला.

हा मुंबई पॅटर्न आहे तरी कसा..?

मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १७ हजारांच्या घरात गेल्याने राज्य सरकारने मुंबईतील सर्वात जास्त रुग्णसंख्या असलेले सात वेगवेगळे झोन तयार केले. या  सात झोनवर सात वेगवेगळ्या आयएएस अधिकार्‍यांची नेमणूक फक्त कोरोनाच्या उपायोजना करण्यासाठी करण्यात आली. या अधिकाऱ्यांचे काम केवळ वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी हव्या त्या उपाययोजना करणे इतकीच आहे. त्यासाठी त्यांना टार्गेट देखील देण्यात आले आहे. अशाप्रकारे नवा पॅटर्न मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राबवत आहेत. 

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांचा डबलिंग रेट हा वाढत असल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या क्षेत्रातील खासदार, आमदार आणि नगरसेवक यांना बोलावून पालिका प्रशासनासोबत एक बैठक घेतली. या बैठकीत अनेक कठोर आदेश देण्यात आले आहेत. त्यासोबत गुणसंख्या कमी करण्यासाठी काय करता येईल याबाबत सूचना देखील ऐकून घेण्यात आल्या. त्याआधारे आता नवीन ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येत आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्लॅनमध्ये मुंबईप्रमाणेच रेड झोनसाठी आयएएस अधिकारी नेमण्याचा विचार देखील केला जाणार आहे.

मुंबई पॅटर्न ठाण्यात राबवल्यास ठाण्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येईल असे अनेकांचे मत आहे. दरम्यान ठाणे महानगरपालिका प्रशासन देखील सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र लोकमान्यनगर, वागळे इस्टेट आणि मुंब्रा याठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *