या दाम्पत्याला मिळाला विठू माऊलीच्या पूजेचा मान..!

.

| पंढरपूर | यंदा आषाढी यात्राच नसल्याने मुख्यमंत्र्यांसोबत मानाचा वारकरी कोण ठरणार व्याबाबत मोठी उत्कंठा होती. मंदिर समितीने बैठकीत सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मंदिरात चोवीस तास विणेकरी म्हणून सेवा देणारे विठ्ठल ज्ञानदेव बडे या ८४ वर्षांच्या वारकऱ्याला हा मान देण्याचा निर्णय घेतला. विठ्ठल बडे हे मानाचे वारकरी ठरले आहेत. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली.

मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बडे यांना हा मान देण्यात येईल, याबाबत सांगितले आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील रहिवासी असून गेली ६ वर्षे ते मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देत आहेत. बडे यांचे संपूर्ण कुटुंब माळकरी असून गेल्या तीन महिन्यापासून लॉकडाऊन असताना ते २४ तास ही सेवा देत आहेत.

दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यंदा मानाचा वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे आणि अनुसया बडे यांना मान मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बडे दाम्पत्याचा सत्कार केला गेला. दरम्यान देव आपल्यावरील संकट दूर करेल अशी आशा या दांपत्याने विठू माऊली चरणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.