स्थानिक नेतृत्वाला कंटाळून आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला – शिवसेना नगरसेवक

| अहमदनगर | पारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना आमचे नगरसेवक परत पाठवा, असा निरोप पाठवला असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, या नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत का प्रवेश केला? याबाबत माहिती समोर आली आहे.

“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आमची नाराजी नाही. स्थानिक नेतृत्वाला कंटाळून आम्ही हा निर्णय घेतला. पारनेरचा पाणी प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला”, असं शिवसेनेचे नाराज नगरसेवक म्हणाले.

“माजी आमदारांच्या हुकूमशाहीमुळे शिवसेना सोडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कोणतीही नाराजी नाही. पण, माजी आमदारांमुळे पक्ष सोडवा लागला”, अशी खदखद त्यांनी यावेळी व्यक्त केली.

“कोणत्याही विकासाची कामे होत नव्हती, म्हणून आम्ही राष्ट्रवादी जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही पुन्हा शिवसेनेत जाणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावल्यास आम्ही ‘मातोश्री’वर जाऊन इथली परिस्थिती मांडू. पण, तूर्तास तरी शिवसेनेत पुन्हा परतण्याचा विचार नाही”, असं नगरसेवक म्हणाले.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीत शिवसेनेला धक्का बसला होता. पारनेरच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके हेदेखील उपस्थित होते. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *