आगळावेगळे शिबीर : मुंबई मनपा घेणार महा प्लाझ्मा दान शिबीर..!

| मुंबई | कोरोनाचे मुंबईतील रुग्ण व मृत्यूचे प्रमाण लक्षात घेऊन एकीकडे रेमडीसीवीरसारखी अत्यावश्यक औषधे खरेदी करतानाच दुसरीकडे प्लाझ्मा उपचारांवर भर देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यादृष्टीने मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पुढील आठवड्यात ‘महा प्लाझ्मा दान शिबीरा’चे आयोजन केले आहे. या प्लाझ्मा शिबीरात ३०० पोलीस प्लाझ्मा दान करणार असून अशाप्रकारचे हे पहिलेच ‘प्लाझ्मा दान शिबीर’ ठरेल.

यापूर्वी रक्तदान शिबीर, नेत्रदान तसेच अवयवदान शिबीर पासून पुस्तक- वह्या वाटपापर्यंत अनेक शिबीरे होत असतात. परंतु कोरोनाच्या लढाईत रुग्णांचे जीव वाचविण्यात प्लाझ्मा उपचारपद्धीताचा उपयोग होते असे लक्षात आल्यानंतर देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील रुग्णालयात कोरोना रुग्णांना प्लाझ्मा देण्याचे काम सुरु झाले आहे. यासाठी पोलिसांचे प्लाझ्मा दान महाशिबीर ही अभिनव कल्पना राबविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी घेतला. यासाठी नियोजन तयार झाले असून ३०० पोलीस ज्यांना यापूर्वी कोरोना होऊन गेला आहे ते प्लाझ्मा दान करणार आहेत. याबाबत आयुक्त चहल यांना विचारले असता, पालिकेच्या केईएम, शीव व नायर आदी रुग्णालयात कोरोना रुग्णांना प्लाझ्मा देण्याची व्यवस्था आहे.

अफ्रेरीस मशीनद्वारे रक्तदानातून प्लाझ्मा वेगळा काढण्याची प्रक्रिया केली जाते. यात दात्याला कोणताही त्रास होत नसून रक्तदानासारखीच ही एक प्रक्रिया असल्याचे ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’चे सहाय्यक संचालक डॉ. थोरात यांनी सांगितले. ‘आयसीएमआर’ व ‘डिजीसीआय’ यांनी राज्यात अफ्रेरीस मशीन असलेल्या काही खाजगी रुग्णालयांनाही प्लाझ्मा उपचाराची परवानगी दिली असून यात दात्याच्या रक्तातील प्लाझ्मा वेगळा काढून पांढऱ्या व लाल रक्तपेशी पुन्हा दात्याच्या शरीरात पाठवले जातात. साधारणपणे एका दात्याकडून ५०० एमएल प्लाझ्मा घेतला जातो. कोरोनातून बरे झालेल्या दात्याच्या शरीरात प्रतिपिंड म्हणजे अॅण्टिबॉडीज तयार होतात व त्यासाठी कोरोनाच्या पहिल्या व दुसर्या टप्प्यातील रुग्णाला प्लाझ्मा दिल्यास त्याच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार होऊन रुग्ण बरा होण्यास मदत होते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अतिगंभीर रुग्णांना याचा उपयोग होतो याबाबत ठोस संशोधनात्मक निष्कर्ष उपलब्ध नाहीत. मात्र अजूनही करोनाची लस उपलब्ध झालेली नसल्याने रुग्ण बरे होण्यासाठी सर्व उपचार पद्धतींचा वापर सध्या जगभरातच केला जात आहे.

१८ ते ६० वयोगटातील व ज्यांचे वजन ५० किलोपेक्षा जास्त आहे असे बरे झालेले कोरोना रुग्ण प्लाझ्मा दान करू शकतात. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयातील प्लाझ्मा उपचाराला गती देण्यासाठी तसेच जनजागृती म्हणून या ‘महा प्लाझ्मा दान शिबीरा’चे आयोजन केल्याचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *