अनलॉक्ड मुलाखत: तुम्ही बैलगाडीने प्रवास करता का.? विरोधकांच्या आरोपांवर उध्दव ठाकरे यांची फटकेबाजी..!

| मुंबई | राज्यभरात कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. मुंबईला तर कोरोनाने मोठ्या प्रमाणात विळखा घातला आहे. यामुळे मुंबईत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यात मुख्यमंत्री फिरत नाहीत अशी होणारी टीका त्यासोबतच मुंबईच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे मुंबईची लाइफलाइन मानली जाणारी लोकल आणि मुंबईची ओळख असलेला वडापाव हे सर्व कधी मिळणार याविषयावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे. सामनाला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी याविषयावर उत्तर दिली आहे.

तुम्ही मंत्रालयात कमीत कमी जाता, फिरत देखील नाहीत..

तुम्ही मंत्रालयात कमीतकमी गेलो असा जो आरोप होतोय त्यात काही दम नाही. तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे. त्या तंत्रज्ञानाचा तुम्ही उपयोग करू शकणार नसाल तर तुमच्यासारखे दुर्भागी तुम्हीच. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कितीतरी काम करतोय. ही मुलाखत संपल्यानंतर मी घरी जाऊन माझ्या मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहे. नुसते आयुक्तच नाहीत, तर सहआयुक्तही या बैठकीला असतील. हे रोजच चाललंय. मध्यंतरी मी मराठवाडय़ातील सर्व आमदारांशी चर्चा केली. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक झाली, परवा विदर्भातील तिन्ही पक्षांच्या आमदारांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाली. म्हणजे मी घरात बसून सगळीकडे जाऊ शकतो. हा तंत्रज्ञानाचा फायदा आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्य कव्हर करतोय आणि मुख्य म्हणजे ताबडतोब निर्णय घेतोय. फिरणं आवश्यक आहे मी नाही म्हणत नाही. पण जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्हाला मर्यादा येतात. तुम्ही एकाच ठिकाणी जाता, पण तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करता तेव्हा तुम्ही सगळीकडे जाता. प्रवासाचा वेळ वाचतो. माझ्यावर आरोप करताहेत त्यांना माझा सवाल आहे, मग तुम्ही विमानाने कशाला जाता? बैलगाडीतून का जात नाही? बैलगाडीतून जा, पायी जा. तंत्रज्ञानाचा उपयोग करणार नसाल तर मग त्या तंत्रज्ञानाचा शोध लावता कशाला?

मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार?

शिवसेना खासदार आणि कार्यकारी संपादक संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना अनेक प्रश्न विचारली. यावेळी मुंबईच्या रस्त्यावर जोपर्यंत वडापाव मिळणार नाही तोवर मुंबई सुरळीत झाली असं देशात कोणीही म्हणणार नाही. त्यामुळे तो केव्हापासून सुरू होईल, असा सवाल त्यांना करण्यात आला. ‘मुंबईत वडापाव मिळण्याच्या दिशेने यासोबतच मुंबई सुरळीत करण्याच्या दिशेने आपले प्रयत्न सुरू आहेत. शिवाय आणखीही बऱयाच गोष्टी आहेत त्याही मिळायला हव्यात. आपण हळूहळू त्या दिशेने जात आहोत.’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

लोकल कधी सुरू होणार?

सध्या मुंबईची लाइफलाइन मानली जाणारी लोकल बंद आहे. मुंबईकरांकडून सातत्याने लोकल सुरू करण्याची मागणी केली जात आहे. आता लोकल कधी सुरू होणार यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘रेल्वे सुरू करूया. वडापाव सुरू करूया, पण एकदा काय ते एक टोक स्वीकारा. घाईगडबडीने, घिसाडघाईने तुम्हाला निर्णय घ्यायचाय? पण लक्षात घ्या, कुटुंबंच्या कुटुंबं आजारी पडताहेत आणि मृत्युमुखी पडताहेत. मग कुटुंबं मृत्युमुखी पडल्यावर घराला जे टाळं लागेल ते लॉकडाऊन कोण उघडणार? घराचं जे लॉकडाऊन होईल त्याचं काय? कुटुंबच्या कुटुंब जर गेलं तर त्या घराचं टाळं कोण उघडणार? म्हणून ते टाळं नको असेल तर या गोष्टी टाळा.’

मंदिर कधी उघडणार?

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरातील मंदिरंही बंद करण्यात आली आहेत. हे कधी सुरू होणार यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, देव हा आपल्यात आहे. देव म्हणताहेत मी तुमच्यात आहे आणि त्यामुळे तुम्ही मंदिरात येऊ नका. आधी हे कोरोनाचं संकट सांभाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *