विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची कार्यालयासमोर उग्र निदर्शने..!

| मुंबई | काल कामगार विरोधी धोरणाविरोधात सरकारी कर्मचारी, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंत्रालयसह मुंबईतील अनेक सरकारी कार्यालयासमोर आपल्या न्याय मागण्यांसाठी शासनाचा लक्षवेध करण्यासाठी उग्र निदर्शने केली होती. कोव्हिड 19 च्या वैश्विक महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता योद्धा म्हणून लढा देणाऱ्या सरकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची कुचंबणा व आर्थिक गळचेपी करण्याचे केंद्र व राज्य शासनाच्या धोरणा विरोधात मुंबईतील मंत्रालय, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, आरोग्य संचालनालाय, अधिदान व लेखा कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, शिधावाटप, जे जे सह सर्व रुग्णालये, पोलीस रुग्णालय, तंत्रशिक्षण, पुरवठा कार्यालय, शासकीय परिवहन सेवा, आणि शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर आज भोजनाच्या सुट्टीत सोशल डिस्टंन्सिंग पाळून जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आदेशांन्वये दि २२ मे व दि ४ जून रोजी सरकारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध केला होता. अनेक वेळा निवेदने देऊनही मध्यवर्ती संघटनेस चर्चेलाही बोलाविले नाही. शासनाने कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास अत्यंत तीव्र आंदोलन नजीकच्या काळात केले जाईल असा इशारा बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौन्ड यांनी आजच्या द्वारसभेत दिला आहे. शिक्षक – शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडेही मा मुख्यमंत्र्यांनी वेळीच लक्ष घालावे असे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष श्री सुभाष मोरे, आणि इनामदार यांनी चेंबूर येथील शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर झालेल्या द्वारसभेत इशारा दिला आहे. शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांनच्या न्याय मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कोव्हिडं 19 नावाखाली सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांचे आर्थिक शोषण सुरूच ठेवले आहे.

कोरोनाच्या नावाखाली सुरू असलेली वेतन कपात,महागाई भत्ता गोठवणूक कर्मचारी विरोधी आहे. कोरोना महामारीशी लढताना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशाही परिस्थितीत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी मा मुख्यमंत्री महोदयांनी मध्यवर्ती संघटनेस व समन्वय समितीस तातडीने चर्चेस बोलवावे व पुढील आंदोलन टाळावे अशी मागणीही द्वारसभेत बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *