उत्तर प्रदेशात बदलले काय..? अग्रलेखातून राऊतांचा योगी सरकारवर घणाघात..!

| मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनात ‘कानपूरमधील पोलिस हत्याकांड, उत्तर प्रदेशात बदलले काय?’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून योगी आदित्यनाथ सरकारवर टीका करण्यात आली आहे. या हत्याकांडाने ४० वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातच झालेल्या नथुआपूर पोलीस हत्याकांडाच्या दुःखद स्मृतींना उजाळा दिला आहे. ४० वर्षांनंतरही उत्तर प्रदेशात पोलिसांना गुंड अशा पद्धतीने मारू शकत असतील तर योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात बदलले काय? असा सवाल या अग्रलेखातून योगी सरकारला विचारण्यात आला आहे.

गुंड टोळ्या आणि त्यांच्या गुन्हेगारीमुळे उत्तर प्रदेशसारखे राज्य दशकानुदशके बदनाम राहिले आहे. विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील गुंडागर्दी संपुष्टात आणली असे दावे अनेकदा केले गेले. मात्र कानपूरमधील पोलीस हत्याकांडाने या दाव्यांवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी कोणाच्या तरी आश्रयाने जी गुंडांची घरे उभी राहिली आहेत ती यापूर्वीच उद्ध्वस्त केली असती तर २ जुलैची दुर्दैवी घटना घडली नसती. बरं, विकास दुबेचे घर अनधिकृत असल्याचे ‘गुप्त ज्ञान’ उत्तर प्रदेश प्रशासनाला आठ पोलिसांच्या मृत्यूनंतर व्हावे यासारखे दुर्दैव कोणते! विकास दुबेसारखा एक गुंड कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवर थेट गोळीबार करून त्यांची हत्या करतो, साथीदारांसह फरार होतो. कायद्याऐवजी गुंडांचे ‘हाथ लंबे’ असल्यामुळेच हे धाडस तो करू शकला. हे असेच सुरू राहिले तर ‘घर घर से अफझल’ निर्माण होतील का याची कल्पना नाही, परंतु उत्तर प्रदेशात ‘घर घर से विकास दुबे’ मात्र निर्माण होऊ शकतील’ अशी टीकाही शिवसेनेने भाजपवर केली.

‘आता विकास दुबे नेपाळमध्ये फरार होऊ शकतो असा संशय असल्याने उत्तर प्रदेश पोलिसांनी तेथील सीमा सील वगैरे केल्याच्या बातम्या आहेत. ते सर्व ठीक असले तरी आपली नेपाळ सीमा अशा बाबतीत नेहमीच चिंतेचा विषय राहिली आहे. त्यात सध्या नेपाळशी आपले संबंधदेखील चांगले नाहीत. या पार्श्वभूमीवर उद्या विकास दुबे आपल्यासाठी ‘नेपाळमधील दाऊद’ ठरू नये म्हणजे मिळवले’ अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

आज जनता कोरोना लॉकडाऊनमध्ये बंदिस्त आहे. उद्या गुंडांपासून सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊनमध्ये राहावे लागेल का, असा प्रश्न तेथील जनतेच्या मनात आहे. कारण उत्तर प्रदेश म्हणजे उत्तम प्रदेश असे म्हटले जाते. उत्तम प्रदेश पोलिसांच्या रक्ताने भिजला. देशाला हा धक्का आहे. असेही ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *