यंदाचा अर्जुन पुरस्कार कोणाला..? बुमराह प्रबळ दावेदार..!

| नवी दिल्ली |  वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, सलामीवीर शिखर धवन, महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा तसेच शिखा पांडे यांची शिफारस यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी होऊ शकते. मे अखेर बीसीसीआयला क्रिकेटपटूंची नावे पाठवायची आहेत. बुमराहने गेली चार वर्षे उत्कृष्ट कामगिरी केली.  याआधी २०१८ ला रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि धवनच्या नावाची शिफारस करण्यात आली होती, मात्र पुरस्कार जडेजाला मिळाला.

बुमराहने १४ कसोटी सामन्यात ६८ आणि ६४ वन डेत १०४ गडी बाद केले आहेत. ५० टी-२० सामन्यात त्याच्या नावावर ५९ बळींची नोंद आहे. आयसीसी क्रमवारीत नंबर एक गोलंदाज बनला असून आॅस्ट्रेलिया, द.आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज येथे पाच-पाच गडी बाद करणारा तो एकमेव आशियाई गोलंदाज आहे.

बीसीसीआयकडूनन यंदा पुन्हा एकदा शमीच्या नावाची शिफारस होण्याची शक्यता नाही. पत्नीसोबतचे त्याचे भांडण न्यायालयापर्यंत पोहोचले. याचा अर्थ तो पुरस्कारासाठी अयोग्य ठरतो. धवनबाबत सांगायचे तर त्याचे समकक्ष असलेले  कोहली, अश्विन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि जडेजा यांना हा पुरस्कार मिळाला आहे.  दुखापतीमुळे मागच्यावर्षी धवन बराचकाळ क्रिकेटपासून दूर राहलिा खरा मात्र सिनियर या नात्याने त्याच्याकडे डोळेझाक करता येणार नाही, असे बीसीसीआयचे मत आहे. २०१८ लादेखील शिखरचे नाव पाठविले होते, मात्र महिला खेळाडू स्मृती मानधना हिला पुरस्कृत करण्यात आले.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही प्रक्रिया ऑनलाईन होणार असून अर्ज आणि इतर माहिती ऑनलाईन मागविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *