कन्नड संघटनांच्या पिरणवाडी गावातील कृत्यावरून सीमा भागात संघर्ष पेटला, मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहून नोंदवला तीव्र निषेध..!

| बेळगाव | महाराष्ट्र – कर्नाटक सीमारेषेवर पुन्हा एकदा पुतळ्यावरून वाद पेटला आहे. येथील पिरणवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. यामुळे येथील मराठी भाषिक रस्त्यावर उतरले आहेत. रायन्ना यांच्या पुतळ्याला मराठी भाषिकांचा तीव्र विरोध आहे. हा पुतळा इतर ठिकाणी हलवावा अशी मागणी मराठी भाषिक करत आहेत.

कन्नड संघटनांनी रात्री ३ वाजता रायन्ना यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर बसवला. संगोळी रायान्ना हे कित्तूर साम्राज्यातील सेनाप्रमुख होते. या पार्श्वभूमीवर पिरनवाडी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यापूर्वी कर्नाटकातील बेळगावमधील मनगुत्ती गावात पोलिसांनी रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने वाद पेटला होता. मनगुत्ती येथील आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जदेखील केला होता.

दरम्यान या बाबत कालच नगरविकास मंत्री व सीमाभाग समन्वयक एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे पत्रात :

बेळगाव जिल्ह्यातील पिरणवाडी गावात हिंदवी स्वराज्य संस्थापक वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर कन्नड भाषा संघटनेकडून जाणीवपूर्वक स्वातंत्र्यसैनिक संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात येत आहे. स्वातंत्र्यसैनिक संगोळी रायन्ना यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास मराठी भाषकांचा कोणताही आक्षेप नाही. उपरोक्त दोन्ही महापुरुषांनी त्यांच्या काळात हिमालयाएवढे मोठे कार्य केलेले असून दोन्ही महान व्यक्तिमत्वं आहेत. परंतु, जाणीवपूर्वक वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरच स्वातंत्र्यसैनिक संगोळी रायन्ना यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रयत्न करणे, वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज चौक असे पूर्वीपासून असलेले नाव बदलण्याची मागणी करणे आदी प्रकार कन्नड भाषक संघटनेकडून करण्यात येत आहेत. यामुळे मराठी भाषक विरुध्द कन्नड भाषक असा तीव्र वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात आवाज उठविण्याऱ्या मराठी भाषकांवर आज सकाळी कर्नाटक पोलिसांकडून अन्यायकारक लाठीचार्ज करण्यात आला, याचा सीमाभागाचे समन्वयक मंत्री म्हणून श्री. छगनजी भुजबळ आणि मी जाहीरपणे तीव्र निषेध करत आहे.

यापूर्वी मनगुत्ती गावातील घटनेवरून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील शिवभक्तामध्ये संतापाच्या भावना आहेत. त्यातच आज पिरणवाडी गावात मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांकडून अन्यायकारक लाठीचार्ज झाल्याने समस्त मराठी बांधवामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तरी, पिरणवाडी आणि मनगुत्ती सारख्या घटनांमध्ये कर्नाटक सरकारने उचित कार्यवाही करून मराठी भाषक विरुध्द कन्नड भाषक असा वाद पेटणार नाही याची सर्वोतापरी काळजी घ्यावी.

आपला नम्र,
एकनाथ संभाजी शिंदे, 

 

दरम्यान, या वाढत्या संघर्षावर विरोधी पक्ष भाजप मूग गिळून गप्प बसले दिसत असून कर्नाटक मध्ये भाजप सरकार असल्याने ते होत आहे का..? असा संशय सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *