कोरोनोवर १०७ वर्षांच्या आजीची मात, मन खंबीर ठेवा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

| मुंबई | कोरोनाबाधित रुग्णाने मन खंबीर ठेवून त्यावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा नये याचीही खबरदारी घेतली पाहिजे. जालन्यामध्ये १०७ वर्षांच्या महिलेने कोरोनावर मात केली आहे, असा दिलासा देतानाच प्रतिकारशक्ती व मनाची इच्छाशक्ती चांगली ठेवावी असा सल्ला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समवेत सुरू असलेल्या चर्चासत्राचा दुसरा भाग आज प्रसारीत झाला. कोरोना: कालावधी, क्वारंटाईनचे प्रकार व काळजी याविषयी शांतीलाल मुथ्था यांनी आरोग्यमंत्र्यांशी यावेळी संवाद साधला.

आरोग्यमंत्री श्री. टोपे यावेळी म्हणाले, महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये, कोविड केअर सेंटर्स आहेत. त्यामध्ये आवश्यक ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. जालन्यामध्ये १०७ वर्षांची महिला, त्यांचा ८० वर्षांचा मुलगा आहे, त्यांचा मुलगा जो साधारण ६०-६५ वर्षांचा आहे आणि त्यांची मुलगी असे सर्वजण कोरोनामधून बरे होऊन घरी परतलेले आहेत. त्यामुळे कोरोना बरा होतो मात्र योग्यवेळी उपचारासाठी दवाखान्यात जाणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *