बस हेच काम बाकी होते – आता शिक्षकांना ‘ हमालीचे ‘ काम..?

| लातूर | अध्यापनाव्यतिरिक्त इतर सर्व कामांत गुंतलेल्या शिक्षकांना आता जिल्हाधिकारी कार्यालयाची आवराआवर करण्याचे कामही प्रशासनाने सोपवले आहे. कोरोना काळात ऑनलाइन अध्यापन, सर्वेक्षणे, नाकाबंदी अशी पडतील ती कामे शिक्षकांना करावी लागली आहेत. त्यात आता या नव्या कामाची भर पडली आहे.

अशैक्षणिक कामे हा राज्यात नेहेमीच वादग्रस्त ठरलेला मुद्दा आहे. उघडय़ावर शौचास बसणाऱ्या नागरिकांचे टमरेल जप्त करण्यापासून ते पोषण आहाराच्या धान्याच्या पोत्यांचे हिशोब ठेवण्यापर्यंत कोणत्याही कामांसाठी शिक्षकांना वेठीस धरण्यात आले. लागोपाठ आलेल्या निवडणुकांमध्ये शिक्षकच शाळाबा झाले. करोना काळातही रुग्णांचे सर्वेक्षण, नाकाबंदी, विलगीकरण कक्षातील काम शिक्षकांवर सोपवण्यात आले.

या क्रमवारीत आता लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने हद्द पार केली आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने कागदपत्रांच्या बस्त्यांवरील (कागदपत्रांचे गठ्ठे) धूळ झटकणे, नव्या कार्यालयात त्यांचे स्थलांतर करण्यासाठी टेम्पोत गठ्ठे भरणे, अशी कामे शिक्षकांवर लादली आहेत, अशी शिक्षकांची तक्रार आहे.

नक्की काय आहे प्रकरण ?

लातूर जिल्हाधिकारी कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे. मात्र तेथील अभिलेख कक्ष जुन्या इमारतीत आहे. जुन्या कार्यालयातील बस्ते नवीन कार्यालयात स्थलांतरित करायचे आहेत. त्यासाठी बस्त्यांवरील धूळ झटकणे, त्यांचे वर्गीकरण करणे, टेम्पोमध्ये बस्ते भरणे, नव्या कार्यालयात उतरवून घेणे अशी कामे आहेत. ही कामे प्राथमिक शिक्षकांवर सोपविण्यात आली आहेत. साधारण ४० शिक्षकांची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे.

शिक्षक संघटनेकडून निषेध

‘महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदे’ने या प्रकाराचा निषेध केला आहे. ‘जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश हे शिक्षकांना अशैक्षणिक काम लावणारे आहेतच. त्याचबरोबर कामाचे स्वरूप पाहता हा शिक्षकांचा अपमान आहे,’ असे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे. तसेच सर्वच संघटनांनी एकत्रित निषेध व्यक्त केला आहे.

शिक्षक दुहेरी कचाटय़ात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शिक्षक हे शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या कचाटय़ात सापडले आहेत. या दोन्ही यंत्रणांचे आदेश शिक्षकांना पाळावे लागतात. ऑनलाइन अध्यापनाचा आठवडय़ाचा आढावा देण्याचे आदेश शिक्षण विभागाने पूर्वीच दिले आहेत, तर स्थानिक प्रशासन इतर कामे लादते, असे एका शिक्षकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *