भूमिपुत्रांच्या अस्मितेचे आगरी कोळी भवन असंख्य कुटुंबे देशोधडीला लावणाऱ्या बिल्डरच्या जमिनीवर का.?

आगरी-कोळी बोली, संस्कृती जतन-संवर्धनार्थ ‘आगरी-कोळी भवन’ वा ‘आगरी-कोळी भाषा दालन’ व्हावे, अशी सर्वसामान्य भूमिपुत्रांची इच्छा होती. त्यासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी पुढाकार घेतला ही आनंदाची गोष्ट आहे. धर्मालेश्वर मंदिराच्या पुढे, तळोजा कॉक्रीट रोड, खोणी येथे स्व.रतनबुवा पाटील आगरी-कोळी आणि वारकरी भवनाचे भूमिपूजन काल पार पडले.

खऱ्या अर्थाने हा क्षण आगरी कोळी बांधवांसाठी मौल्यवान असाच आहे, परंतु ती आनंदाची भावना आगरी कोळी बांधवांच्या डोळ्यात दिसत नाही, याच कारण या भवनाचा डोलारा उभा केला जाणार तो लोढा बिल्डरच्या जमिनीवर..! १५ गुंठे जमीन लोढा कडून घेऊन तिथे हे भवन उभारण्याची तयारी मनसे आमदार राजू पाटील यांनी सुरू केली. म्हणजे जिथे हे अस्मितेचे भवन उभारले जाणार त्याचा ७/१२ पलावा डेव्हलपरच्या नावावर आहे.

आधी दलाली करून आपल्याच आगरी कोळी बांधवांच्या जमिनी बळजबरीने बिल्डरच्या घशात घालायच्या आणि नंतर त्याच बांधवांच्या भावनांनचे भवन त्याच जागेवर उभारायचे..! हा निव्वळ अवसानघातकी प्रकार..!

जेवढ्या पोटतिडकीने मी भवनाचा प्रश्न सोडणार असे सांगायचं तेवढ्याच पोटतिडकीने आपल्याच आगरी कोळी बांधवांच्या छाताडावर पाय रोवणाऱ्या बिल्डरकडून जमीन घेऊन आगरी कोळी भवन उभारण्याचा निर्ल्लज देखावा करायचं, हे चीड आणणारे असेच आहे. आमदार साहेबांनी या भवनासाठी एकतर स्वत:च्या मालकीची जमीन देणे अपेक्षित होते किंवा ती देणे शक्य नव्हते तर आपल्याच दिलदार आगरी कोळी बांधवांना आवाहन केले असते तर कित्येक दिलदार आगरी कोळी बंधूंनी आपली जमीन या भवनासाठी सहज दिली असती. त्या बिल्डरच्या कृपादृष्टिची तर अजिबातच गरज पडली नसती.

ज्यांनी आगरी कोळी बांधवांना देशो धडीला लावले, त्यांच्याच कृपाशीर्वादाची या भूमिपुत्रांना अजिबात गरज नाही. त्यामुळे आमच्या पूर्वजांच्या जमिनीला गिळंकृत करणाऱ्या राक्षसांचा आणि त्यांना मदत करणाऱ्या आमच्यातीलच असणाऱ्या दलालांचा या आमच्या भावनिक अस्मिता असणाऱ्या आगरी कोळी भवनातील सुळसुळाट थांबेल, अशी आई एकविरा चरणी आशा करूयात..!

– हितेश भोईर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *