मोदींच्या समर्थनार्थ IRCTC चे तब्बल २ कोटी ईमेल, पाठवली मोदींनी शीख समुदायासाठी केलेल्या कामाची पुस्तिका..!

| नवी दिल्ली | देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण अद्यापही तापलेलं आहे. यादरम्यान आयआरसीटीसीकडून जवळपास दोन कोटी ईमेल पाठवण्यात आले आहेत. ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत हे ईमेल पाठवण्यात आले आहेत. ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या या ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शीख समुदायासोबत असणाऱ्या संबंधांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलन सुरु असताना करण्यात आलेल्या या ईमेलमध्ये मोदींनी शीखांसाठी घेतलेले १३ निर्णय सांगण्यात आले आहेत.

आयआयरसीटीसीने ग्राहकांना एकूण ४७ पानांची पुस्तिका ईमेल केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शीख समुदायासोबत विशेष संबंध” असं या पुस्तिकेचं नाव आहे. नव्या कृषी कायद्यांबाबत जागरुक करण्यासाठी तसंच गैरसमज मिटवण्यासाठी हा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचं अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे.

ही पुस्तिका हिंदी, इंग्लिश आणि पंजाबी भाषेत आहे. १२ डिसेंबरला थांबवण्यात आलेले हे ईमेल आयआरसीटीसीच्या संपूर्ण डेटाबेसला पाठवण्यात आले आहेत. तिकीट बूक करताना प्रवासी आपली माहिती देत असतात, त्याआधारे हे ईमेल पाठवण्यात आले असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

आयआरसीटीसीच्या अनेक ग्राहकांनी सोशल मीडियाच्या आधारे आपल्याला हा ईमेल आल्याची माहिती दिली आहे. दुसरीकडे आयआरसीटीसीने फक्त शीख ग्राहकांना हा ईमेल पाठवल्याचा आरोप फेटाळला आहे. “ईमेल सर्वांना पाठवण्यात आले आहेत, कोणत्याही ठराविक समाजाला नाही. याआधीही लोककल्याण योजनांसाठी आयआरसीटीसीकडून अशा पद्धतीने पुढाकार घेण्यात आला आहे,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

अधिकाऱ्यांना लोकहितासाठी हा एक धोऱणाचा भाग असल्याचंही मान्य केलं आहे. पुस्तिकेत १९८४ दंगलीतील पीडितांना देण्यात आलेला न्याय, जालियनवाला बाग स्मारक, करमुक्त लंगर, कर्तारपूर कोरिडोअर अशा एकूण १३ निर्णयांचा उल्लेख आहे. १ डिसेंबरला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, हरदीप सिंह पूरी यांनी गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *