वाचन प्रेरणा दिवस विशेष : हरवलेल्या माणसांची शोधयात्रा – दादासाहेब थेटे लिखित ‘ हरवलेली माणसे ‘ या पुस्तकाचे स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी यांनी केलेलं विवेचन…

आज वाचन प्रेरणा दिन, त्या निमित्ताने एक नवे कोरे पुस्तक लवकरच वाचकांच्या हातात येणार आहे ते पुस्तक म्हणजे ‘ हरवलेली माणसे ‘. लेखक दादासाहेब थेटे यांचे हे दुसरे पुस्तक, यापूर्वी त्यांचा ‘ वेदनेचा डोही ‘ हा कविता संग्रह प्रकाशित करण्यात आला होता. त्यातून समाजाच्या विविध वेदनांना त्यांनी पाझर फोडला होता, आता त्यांचे येणारे पुस्तक ‘ हरवलेली माणसे ‘ हे देखील प्रत्यक्षात त्यांनी जे अशक्य कायापालट करून दाखविले आहेत त्यांची ओळख करण्याचे आहेत.

या नव्या येणाऱ्या पुस्तकाचे स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी यांनी मांडलेले विवेचन..!

दादासाहेब श्रीकिसन थेटे, हे माझे जुने मित्र आणि सेवा कार्यातील मार्गदर्शक आहेत. अंबड, (जिल्हा जालना ) येथे ते अध्यापन करतात. सामाजिक जाणिवेमुळे महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांशी दादासाहेबांचा गेली दोन दशके विकत संबंध आला. शेकडो संस्थांना त्यांनी भेटी दिल्या. कार्यकर्त्यांना देणगीदार आणि मदतीचे नवे हात मिळवून दिले.
सामाजिक जाणिवेचे लेखन वृत्तपत्रातून करणाऱ्या लेखकात दादासाहेब सध्या अग्रणी आहेत.

लिहिण्याच्या पलीकडे जात वंचितांच्या जगण्याला स्पर्श करण्याची त्यांची धडपड असते. वेश्यांच्या जीवनातील दाहकता मांडणारे धागे उभे आडवे, माणसं, अशी पुस्तक लिहिणाऱ्या डॉक्टर अनिल अवचट यांच्या लेखनशैलीची मला सतत आठवण होते. सामाजिक जाणिवेच्या पत्रकारितेचा हाच वारसा दादासाहेब पुढे चालवीत आहेत, याची प्रचिती हरवलेली माणसे या पुस्तकातून मिळते.

नुसतेच लिहून काय होणार?त्यापलीकडे जात वंचितांच्या जगण्यातील वेदना कमी करण्यासाठी आपले परिश्रम आणि त्याग हवा , असे दादासाहेबांना वाटते. त्यांच्यातील कार्यकर्ता, हा लेखक आणि साहित्यिक, यापेक्षा जास्त जागृत आहे. आमचे मैत्र जमले, ते यामुळेच.

स्नेहालय आणि अनामप्रेम परिवारातील सर्व प्रकल्पांना त्यांनी भेटी दिल्या. वंचितांशी थेट संवाद केला. येथील प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक जिवंत कहाणी किंवा कादंबरी आहे, हे त्यांचेच वाक्य. अशा दृष्टीने आमच्याच स्नेहालय परिवारातील सदस्यांकडे आम्ही कधीच पाहिले नव्हते.

दादासाहेबांनी अनेक सहकारी मित्रपरिवारात स्नेहालयबद्दल सांगितले. या प्रक्रियेतून माजातील लालबत्ती राहणार्‍या महिला, बाधित मुले, दिव्यांग बालके अशांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यास मोठी मदत झाली. अगदी असेच लोकप्रबोधन त्यांनी मानसिक आजारी , एड्सग्रस्त, वाट चुकलेले लोक, शेतकरी – कष्टकरी समाज यांच्यासंदर्भातील केले आहे.

व्यक्तिगत स्तरावरील समाज वाचन -चिंतन – मंथन सार्वजनिक करण्यासाठी त्यांनी दैनिक लोकमत मध्ये मंथन ( रवीवार) पुरवणीत अनेक लेख लिहिले.

अन्याय – उपेक्षा- विषमता- अत्याचार यांचा सामना करणाऱ्या , त्यांचे बळी ठरलेल्या माणसांच्या कहाण्या अतिशय भावोत्कट पद्धतीने त्यांनी लिहिल्या आहेत.

अशा सर्व वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या आणि काही न झालेल्या जीवंत
कहाण्यांचा संग्रह म्हणजेच त्यांचे
” हरवलेली माणसे ” हे पुस्तक..

१६० पृष्ठांच्या या पुस्तकात ४५ जीवंत कथा आहेत. या सर्व कल्पिताहूनही अद्भूत, अस्वस्थ करणाऱ्या सत्यकथा आहेत. दादासाहेब यांच्या कथा म्हणजे प्रचलित दांभिक, अप्पलपोट्या आणि असंवेदनशील समाज आणि शासन व्यवस्थेवर ओढलेले जबरदस्त आसुड आहेत.

हरवलेला माणूस, या पुस्तकातील पहिल्या कथेतून विश्वनाथ सोनटक्के तथा जालू याची कहाणी ते मांडतात. कचराकुंडीत पडलेले, सडलेले उचलून खाणारा, विष्ठा चिवडणारा मानसिक आजारी जालुला लोक मजा म्हणून मारायचे – घाण शिव्या द्यायचे -त्याची कुचेष्टा करायचे.

जालू कपड्यातच संडास करायचा, कपडे न झालता सर्वत्र फिरायचा. दगड खायचा. आशा जालूला परत माणसात आणण्याचा विडा दादासाहेबांनी उचलला. या प्रक्रियेत त्यांना आलेले अनुभव समाजासमोर त्यांनी धरलेला आरसा आहे. जादू याला आंघोळ घालताना दादासाहेबांना जाणवले की , कुठल्याही देवाच्या मस्तकावरील अभिषेकापेक्षा जालु सारख्याला आंघोळ घातल्याने मिळणारा आनंद उच्च अध्यात्मिक कोटीचा असतो. या प्रयत्नांनी जालू बरा होतो. पुन्हा माणसात येतो. मग चेष्टा करायला आणि मारायला समाज नवीन मनोरुग्ण शोधतो. आपले विकृती शमवायला असे मनोरुग्ण वापरणारा समाज सुदृढ मानसिकतेचा आहे काय हा प्रश्न दादासाहेब आपल्यासमोर उभा करतात. बाबा आमटे यांना तुळशीराम नावाच्या कुष्ठरोग्यांची सेवा कार्याची प्रेरणा दिली. सेवा करताना माणसाच्या मनाची शुद्धी कशी होत जाते हे दादासाहेब या आणि इतर कथातुन मांडतात. खरे तर प्रत्येक कथेतील असे याबद्दल असे भरपूर लिहिता येईल.

वयात आलेली मृगजळी तिच्या कष्टकरी बापाची विनवणी न जुमानता दुसऱ्या जातीच्या मुलासोबत पळून जाते. तिची फसवणूक होते. बाप मरतो. शेवटी एका रेल्वे स्थानकासमोर आपली बेवारस मुलं सांभाळत ती धंदा करते. समज नसताना केलेल्या प्रेमापोटी आयुष्याचं मातेरं करून घेणाऱ्या मुलींची ही कथा प्रातिनिधिक आहे.

आभाळ कोसळत तेव्हा, या कथेत समस्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींचं हतबल जीवन तर पिकलं पान
या सत्यकथेत रुक्मिणीबाई साखरे , या श्रीमंतांच्या आलीतील म्हातारीची मरणकथा दादासाहेब मांडतात. मूल -बाळ, नातेवाईक असताना वृद्धांची कशी परवड होते त्यातून होते. सेवा संकल्प, ही संस्था नंदू आणि आरती पालवे हे दांपत्य पळसखेड ( ता.चिखली, जिल्हा बुलढाणा ) येथे चालवते.

येथे भेट दिल्यानंतर दादासाहेबांना मानसिक आजारी स्त्री-पुरुषांचे, बेवारस लोकांचे हादरवून टाकणारे जग उलगडले. सेवा संकल्पचे कार्याचे प्रेरक अंतरंग या कथेतून ते मांडतात. निर्विकारी कृष्ण, ही एका एड्सबाधित बालकाची वेदनादायक कथा. ती आपल्याला इन्फंट इंडिया, या बीड मधील दत्ता आणि संध्या बारगजे दाम्पत्याच्या कामाची ओळख करून देतात.

दुष्काळ – कर्जबाजारीपणा- दारू आणि इतर व्यसने- अंधश्रद्धा – स्त्री आणि मुलींकडे भोगवस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन, यामूळे उद्ध्वस्त झालेल्या आयुष्यांच्या दादासाहेबांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या – पाहिलेल्या. पुस्तकातील या सत्यकथा वाचकाला अंतर्मुख करतात.

हत्या आणि आत्महत्या, एकच प्याला, इनाम एक लाख, मी एक वेश्या , कारे माणूस घडविलास, उघड्यावरील नशीब, चिखल, माझ्यासारख्या म्हातार्‍याला फक्त तुझा हात दे, मी गणेश टेकाळे , मोकळा श्वास, माझी शाळा, मेनाचे घर शेणाचं घर, मला बुद्ध आठवतो, कथांमधून व्यक्त होणारी, माणसांना हतबल करणारी सध्याची विषमतेच्या पायावरील सामाजिक व्यवस्था ताकदीने व्यक्त होते.

कल्पनेच्या पायावर रचलेल्या कथा कादंबऱ्यापेक्षा दादासाहेबांनी लिहिलेल्या सत्यकथांचे मोल जास्त आहे. सध्याचे समाजजीवन त्या वाचकांसमोर उलगडतात. स्वतःच्या परिघातच जीवन जगणाऱ्या ,पोट भरलेल्या लोकांना अपरिचित असे सामाजिक वास्तव दादासाहेबांनी या पुस्तकातून मांडले आहे.

मी कोणी लेखक, समीक्षक नाही. सामाजिक प्रश्नांवर माझ्या कुवतीनुसार काम करणारा कार्यकर्ता आहे. दादासाहेबांनी मांडलेले वाचतो, जे मला रोज दिसते. त्यातील काही प्रश्नांवर स्नेहालय आणि अनाम प्रेम परिवार कामही करतो. परंतु समाजाला या अनुभवातून संवेदनशील कसे करायचे, हे कोडे आम्हाला उघडत नाही. दादासाहेबांच्या सत्य प्रथांच्या लिखाणामुळे , त्याच्या पुस्तकरूपाने प्रसिद्धीमुळे, समाजाच्या बोथट संवेदना जागृत होतील असे मला वाटते. याचा परिणाम म्हणून वंचितांच्या जगण्याला मुठभर संवेदनशील माणसांचा आधार मिळाला तरी पिया लिखाणाचे आणि धडपडीची फलश्रुती ठरेल. दादासाहेबांच्या सामाजिक जाणीवेच्या लिखाणाला तसेच या पुस्तकाच्या प्रकाशनाला आणि वितरणाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.

– डॉ. गिरीश कुलकर्णी, अहमदनगर, ९०११०२०१७३ ( लेखक प्रसिद्ध अश्या स्नेहालयचे संचालक आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published.