संपादकीय : शेतकरी आंदोलनातील शिरोमणी

सध्या आपल्या राज्यात दुधाचे आंदोलन पेटले आहे. असेच मोठे , भव्य व विश्वासू आंदोलन खोती पद्धत रद्द व्हावी म्हणून झाले होते. शासनाला कूळ कायदा बनविण्यास भाग पाडणारे शेतकरी नेते होते नारायण नागो पाटील… चरी कोपरचा ऐतिहासिक सहा वर्षांचा संप व त्यानंतर शासनाला कायदा करण्यास भाग पाडणाऱ्या या नेत्याच्या आठवणींना त्यांच्या जयंतीनिमित्त उजाळा दिला जात आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणामध्ये जमीन कसणाऱ्या कुळांची खोतांकडून पिळवणूक होत होती. या पिळवणुकीतून शेतकऱ्यांची सुटका करणाऱ्या नारायण नागू पाटील यांची २९ आॅगस्टला १२४ वी जयंती. जगातील सर्वात मोठा शेतकऱ्यांचा संप या नेत्याने घडवून आणला होता.

नारायण नागू पाटील यांच्यावरील विश्वास, प्रेमापोटी हजारो शेतक-यांनी सलग सात वर्षे जमीनच कसली नाही, हा विक्रमच होता. पण, आपले दुर्दैव असे की, या संपाला आपण विस्मृतीच्या गर्तेत टाकले आहे. जुन्या पिढीने हा इतिहास नव्या पिढीला सांगण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे.

शेतक-यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळावी यासाठी देशातील शेतकरी संपावर गेले आहेत. सरकारला याप्रश्नी जाग आणून देण्यासाठी हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतण्यात येत आहे. अन्नपदार्थाची नासाडी हा या आंदोलनाचा एक प्रतीकात्मक भाग असला तरी त्यावरही आता टीका होत आहे. गेल्यावर्षी शेतक-यांनी असाच संप करून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सरकारने शेतक-यांच्या मागण्यांची तड लावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते, पण त्याची पूर्तता काही झाली नाही. त्यामुळे शेतक-यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. या शेतकरी संपामुळे काही वर्षापूर्वी म्हणजेच २७ ऑक्टोबर १९३३ पासून १९३९ पर्यंत ७ वर्षे जमीन न कसता रायगड (पूर्वीचा कुलाबा) जिल्हा जवळील चरी येथील शेतक-यांनी केलेल्या संपाची आठवण होते. या आंदोलनादरम्यान शेतक-यांची चांगलीच ससेहोलपट झाली. पण, त्यांनीही जिकिरीने आंदोलन पेटवत ठेवले. आंदोलनादरम्यान काही शेतकरी जंगलामधील लाकूड फाटा तोडून उपजीविका करत असत, तर जंगलातील करवंद तसेच कांदा, बटाटा विकून जीवन जगत होते. हा संप खोतांच्या अत्याचारविरोधात शेतकरी कष्टकरी यांनी उगारलेल्या एल्गाराचे मूर्तिमंत उदाहरण होते. प्रदीर्घ काळ चाललेल्या संपामुळे कुळांना संरक्षण देणा-या कुळ कायद्याची निर्मिती झाली. ‘कसेल त्याची जमीन’ हे तत्त्व स्वीकारण्यात आले. या संपाचे नेतृत्व केले होते, नारायण नागू पाटील यांनी. शेतकरी, कष्टकरी यांची मोट बांधून त्यांच्या मनात खोती पद्धतीविषयी त्वेष निर्माण करण्याचे जोखमीचे काम केले. त्यामुळेच चरीच्या ७ वर्षे चाललेल्या अभूतपूर्व संपाची दखल आपल्याकडे फारशी घेण्यात येत नाही. याचे अतीव दु:ख होते.

कुलाबा (आताचा रायगड) जिल्ह्यात खोत आणि त्यांच्या खोती पद्धतीने धुमाकूळ घातला होता. कुळाच्या शेतीमधील भाजीची मालकी खोतांची असे. कुळाने जर शेतामध्ये आंब्याचे झाड, नारळ किंवा फणसाचे झाड लावले असेल, तर झाडांच्या फळांवर खोतांचा हक्क असे. तसा अलिखित करार होता. कुळाच्या गावातील जमीन गावाच्या सामूहिक मालकीची असली तरी अप्रत्यक्षपणे खोत त्यावर मालकी हक्क सांगत असे. खोत शेत मजुरांकडून, कुळांकडून सर्व खासगी कामे व जमिनीच्या मशागतीची कामे धाकदपटशाने करून घेत असत. कुळाने गुडघ्याच्या खाली आणि कमरेच्या वर कपडे घालण्याची परवानगी नव्हती. खोत जर शेतमजुरांच्या (कुळाच्या) जवळ आला, तर शेत मजुराने स्वत:च्या पायाची चप्पल स्वत:च्या डोक्यावर ठेवायची आणि जोपर्यंत खोत तिथून जात नाही, तोपर्यंत चप्पल डोक्यावरून काढायची नाही.

खोतांकडून दोन प्रकारची धान्याची मापे असत, त्यांना ‘फरा’ म्हणत. त्यातील एक पोशा फरा आणि दुसरा नाग्या फरा. फळ ठेवण्यासाठी वापरण्यात येणा-या खोक्याला फरा म्हणतात. पूर्वी पायलीचे एक मण असे माप असायचे. खोत मात्र कुळांना धान्य देताना साडे अकरा पायलीचे माप एक मणासाठी वापरीत असत, त्याला पोशा फरा म्हणत. कुळ्यांकडून धान्य घेताना साडेबारा ते चौदा पायली मावेल असे मोठय़ा आकाराचे फरे वापरत. त्याला ते नाग्या फरा असे म्हणायचे. त्यामुळे शेतकरी त्रासला होता. खोताचे काम वसुली करणे. जर एखाद्या कुळाने वसुली दिली नाही, तर त्या कुळातील संपूर्ण कुटुंब त्या खोतांचे गुलाम म्हणून वावरत असे. अमानवीय स्वरूपाचे कायदे खोताने कोकणात लागू केले होते. त्यामुळे चिपळुणमधील कोळकेवाडी येथील खोतांच्या अत्याचाराविरोधात बाळाजी बेंडके यांनी आवाज उठवला. त्यांनी खोतांविरुद्ध मोर्चा काढल्याने खोताने हंटरने त्यांना मारून टाकले. त्यानंतर १९०५ मध्ये पेण-वढाव येथे चांगा डुकल्या म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांचा संप घडवण्यात आला. हा संप खोतांनी संपवला. पेण तालुक्यातील वाशी येथे १९२१ ते १९२३ या कालावधीत खोतांविरुद्ध संप घडविण्यात आला. त्यांचे नेतृत्व हिरू महाडू म्हात्रे यांनी केले. पेण -वाशीचा शेतक-यांचा संप नारायण नागू पाटील यांनी जवळून पाहिला. त्यांनी शेतकरी वस्त्यांना भेटी दिल्या. तेव्हापासूनच त्यांच्या मनात खोतीपद्धतीविषयी तिरस्कार निर्माण झाला.

ही प्रथा-परंपरा बंद व्हावी यासाठी त्यांनी शेतक-यांना संघटित करण्याकरिता १९२७ मध्ये कोकण प्रांत शेतकरी संघाची स्थापना केली. भाई अनंत चित्रे हे या संघाचे सेक्रेटरी होते. या संघाच्या माध्यमातून कोकण प्रांतातील आगरी, कोळी, कराडी, कुणबी, मराठा, तेली, माळी, भंडारी, आदिवासी व अस्पृश्यांना एकत्र करीत त्यांची मोट बांधण्याचे काम केले. त्यांच्यात खोती पद्धतीविरोधात वन्ही पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर २५ डिसेंबर १९३० मध्ये पहिली कुलाबा जिल्हा शेतकरी परिषद भरवण्यात आली. त्यानंतर कोकण प्रांतात अनेक ठिकाणी परिषदा झाल्या. नारायण नागू पाटील यांचे हे कार्य तत्कालीन खोतमंडळींना रुचणारे नव्हते. त्यांनी भाडोत्री गुंड पाठवून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याला यश न आल्याने जाती-जातीत विद्वेष परसवण्याचा प्रयत्नही करून पाहिला. तरीही त्यांना यश आले नाही. शेतक-यांची शक्ती एकवटलेली पाहता खोतांनी १९३६ मध्ये राष्ट्रतेज, कुलाबा समाचार या पत्रांचा आधार घेत हे आंदोलन तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकरी, मजुरांसाठी लढणा-या नारायण नागू पाटील यांना आपले हक्काचे पत्र असावे, त्याआधारे इथल्या जनतेच्या समस्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील, असे वाटत होते. त्यातूनच त्यांनी ५ जुलै १९३७ मध्ये ‘कृषिवल’ हे दैनिक काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुलाब्यातील चळवळ नारायण नागू पाटील यांच्या घरातून चालवली. त्यामुळेच २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचे आंदोलन छेडले, त्यात पाटील अग्रभागी होते. या आंदोलनामुळे त्यांना बाबासाहेबांना जवळून पाहता आले, त्यांचे विचार समग्रपणे आत्मसात करता आले. नारायण नागू पाटील यांनी चरी येथे एक परिषद घेण्याचे ठरवले. त्यात बाबासाहेबांना बोलवण्यात आले. ते मुंबईला भाऊच्या धक्क्यातून बोटीत बसले आणि कुलाबा जिल्ह्यात आले. तिथे त्यांचे जंगी स्वागतही करण्यात आले. २ हजार शेतकरी त्यात सहभागी झाले. शेतक-यांनी लाल बावटा फिरवत सावकारशाही नष्ट करा, जमीनदारी नष्ट करा आदी घोषणाही दिल्या. येथील भाषणात बाबासाहेबांनी स्वतंत्र पक्षाची घोषणा केली.

त्यानुसार १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापनाही केली. त्यानंतर झालेल्या मुंबई विधानसभेमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर(मुंबई), आर. आर. भोळे (पुणे-पश्चिम), खंडराव सखाराम सावंत (सातारा-उत्तर), विनायक आर. गडकरी (पुणे-पूर्व), रामकृष्ण गंगाराम भाताणकर (ठाणे-दक्षिण), अनंत वि. चित्रे (रत्नागिरी-उत्तर), गंगाराम रा. घाटगे (रत्नागिरी), शामराव विष्णु परुळेकर(रत्नागिरी-दक्षिण), प्रभाकर जनार्दन रोहम (अहमदनगर), जिवाप्पा सुभान ऐदाल े(सोलापूर-उत्तर), दौलतराव गुलाब जाधव (खान्देश-पूर्व), भाऊराव कृष्णराव गायकवाड (नाशिक पश्चिम), बळवंत हनुमंत वराळे (बेळगाव उत्तर), दत्तात्रय वामनराव (ठाणे उत्तर) आदी उमेदवार निवडून आले. पण या निवडणुकीमध्ये नारायण नागू पाटील यांचा ११७ मतांनी पराभव झाला. सुरभा नाना टिपणीस, सुभेदार सवादकर यांनाही पराभव पत्करावा लागला. तरीही चरीचा संघर्ष सुरूच होता. स्वतंत्र मजदूर पक्षाच्या १४ आमदारांच्या पाठिंब्यावर तसेच शेतक-यांच्या उपासमारीला आधार बनवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धत बंद करण्याचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले. त्यानंतर सरकारला जाग आली. सरकारने तत्कालीन महसूलमंत्री मोरारजी देसाई यांना संपक-यांच्या भेटीस पाठवले. त्यांनी शेतक-यांचा आढावा घेतला व त्यानंतर या बाबतीतला अहवाल सरकारला सादर केला. १९३९ रोजी सरकारने कुळ कायद्याची निर्मिती केल्याने २७ ऑक्टोबर १९३३ पासून १९३९ पर्यंत ७ वर्षे जमीन न कसता शेतक-यांनी केलेला संप अखेर संपुष्टात आला. या आंदोलनाचे फलीत म्हणून की काय आंदोलन संपल्यानंतर जन्मलेल्या मुलींची नावे चरीबाई, चरूबाई असे ठेवण्यात आले.

राज्यात शेतकरी शेतमालाला भाव मिळावा म्हणून झगडत आहेत. पण चरीचा संप झाला, त्याला ८५ वर्षे झाली आहेत. तेव्हा आजच्यासारखी संपर्काची प्रभावी माध्यमे नव्हती. तरीही नारायण नागू पाटील यांच्यावरील विश्वास, प्रेमापोटी हजारो शेतक-यांनी सलग सात वर्षे जमीनच कसली नाही, हा विक्रमच होता. पण, आपले दुर्दैव असे की, या संपाला आपण विस्मृतीच्या गर्तेत टाकले आहे. जुन्या पिढीने हा इतिहास नव्या पिढीला सांगण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे.

– राजेश सावंत, अतिथी संपादक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *