बृहन्मुंबईतील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्या..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्यातील कोरोना महासंकटाचा मुकाबला आपल्या समर्थ नेतृत्वाखाली राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी प्रामाणिकपणे करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या धिरोदात्त मार्गदर्शनाखाली आपले राज्य या संकटातून लवकरच मुक्त होईल असा सार्थ विश्वास संघटनेला आहे. तसेच संघटनेच्या आग्रही विनंतीचा सकारात्मक विचार करून शासनाने १५ जून पासून मुंबईत लोकल रेल्वे सेवा सुरू केली, परंतु सद्यस्थितीत मंत्रालय व अन्य काही शासकीय कार्यालये वगळता अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना लोकल रेल्वेने प्रवास करण्यास रेल्वे प्रशासनाने मज्जाव केला आहे.  वास्तविक पाहता बृहन्मुंबई मधील ९० टक्के शासकीय कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी लोकल रेल्वेने प्रवास करतात. आता शासन निर्णयानुसार दिनांक ८ जुन पासून १५ टक्के कार्यालयीन उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे,  असे बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी दैनिक लोकशक्ती शी बोलताना सांगितले.

संघटनेच्या माहिती नुसार रेल्वे प्रशासनाने दिलेल्या परिपत्रकात फक्त पोलिस, शासकीय आरोग्य सेवा आणि मंत्रालयीन कर्मचारी यांनाच प्रवासाची मुभा असल्याचे नमूद केले आहे. याआधारे अनेक रेल्वे स्थानकात शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवेशच दिला जात नाही. अशा परिस्थितीत विरार, कल्याण, कसारा, कर्जत, पनवेल या ठिकाणाहून बसने प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे होत आहे. या करिता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवास करण्याची अनुमती देण्याबाबत आपल्या स्तरावरुन रेल्वे प्रशासनाला त्वरित आदेश द्यावेत , याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन दिले असल्याचे सचिव अविनाश दौंड यांनी सांगितले आहे.

पुढे सांगताना ते म्हंटले की, आता फास्ट आणि स्लो दोन्ही लोकल ठराविक फेऱ्यांत सुरू झालेल्या असलेल्या तरी स्लो लोकल फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कसारा ते कल्याण आणि कर्जत ते कल्याण या दरम्यानच्या उपनगरात अनेक कर्मचारी वास्तव्यास आहेत त्यांच्यासाठी मधील रेल्वे स्थानकांवर रेल्वे थांबवण्यात यावी आणि सध्या विरार फास्ट लोकल या मुंबई सेंट्रल वरुन थेट चर्चगेट येथे ये- जा करत आहेत, सदर फेऱ्या पुर्वीप्रमाणे दरम्यानची सर्व स्थानके घेणाऱ्या असाव्यात.

एकंदरित , सर्व सरकारी कर्मचारी यांना या लोकल सेवेने प्रवास करण्यास अनुमती देण्यात यावी, अशी आग्रही मागणी संघटनेने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *