#coronavirus- ३ मे आजची आकडेवारी..!



| मुंबई | देशाबरोबरच राज्यातही करोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे. आज राज्यात करोनाने २७ जणांचा बळी घेतला असून ६७८ नवे रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १२ हजार ९७४ वर पोहचली आहे. यामध्ये आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची ५४८ ही संख्या समाविष्ट आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

राज्यात मुंबईत करोना बाधितांची सर्वाधिक संख्या आहे. आज दिवसभरात मुंबईत करोनाने २१ जणांचा बळी घेतला तर ४४१ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर करोनाबाधितांची एकूण संख्या ८ हजार ६१३ वर पोहचली आहे तर आतापर्यंत ३४३ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात १ हजार ८०४ रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे.

मागील चोवीस तासांत देशभरात करोनाचे २ हजार ४८७ नवे रुग्ण आढळले असून, ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४० हजार २६३ वर पोहचली आहे व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. देशभरातील एकूण ४० हजार २६३ करोनाबाधित रुग्णांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले २८ हजार ०७० रुग्ण, रुग्णालयातून उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले १० हजार ८८७ जण तर करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ हजार ३०६ जणांचा समावेश आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात खबरदारीचे सगळे उपाय योजले जात आहेत. लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला असला तरीही सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहनही करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कालच करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन वाढवण्यात आल्याची घोषणा केली. आणखी दोन आठवडे म्हणजेच १७ मेपर्यंत देशभरात लॉकडाउन कायम असणार आहे. त्यानंतर काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जे राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित मजूर आहेत त्यांना त्यांच्या गावी जाता यावं म्हणून बस सेवा सुरु करण्यात आली आहे. काही विशेष ट्रेनही सोडण्यात आल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *