किल्ले राजगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या स्वराज्य लक्ष्मी महाराणी सईबाई यांच्या समाधीचा व परिसराचा विकास होणार; मराठीमाती प्रतिष्ठान सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्याला यश

| दैनिक लोकशक्ती ऑनलाइन / ठाणे | स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं हवेली तालुक्यातील तुळापूर येथील स्मृतीस्थळ, शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील स्मारक तसंच तूळापूर आणि वढु बुद्रुक परिसराचा विकास तसेच महाराणी सईबाई यांच्या समाधी स्थळाचा विकास करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच केली.

विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सुचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई यांचे राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळ परिसरचाही विकास करण्यात येईल. महाराष्ट्राचा अभिमान आणि अस्मिता असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी व छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री श्रीमंत सईबाई राणीसाहेब यांच्या रायगड पायथ्याशी असलेल्या स्मारकासाठी आगामी काळामध्ये विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सभापती यांच्या दालनांमध्ये मिटिंग बोलावण्यात यावी. सदरील मिटिंगमध्ये स्थानिक खासदार व आमदार यांना सुध्दा त्याबाबत निमंत्रण द्यावे. आगामी येणार्या अर्थसंकल्पात छत्रपती सईबाई राणीसाहेब यांच्या स्मारकासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही, असे मत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजित पवार यांनी विधानपरिषदेत व्यक्त केले. महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वये निवेदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या स्थळांचा होणार असलेला वैभवशाली विकास कसा असेल हे सभागृहात सांगितले.

दरम्यान महाराणी सईबाई यांच्या समाधीचा विषय सातत्याने खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनातून मराठीमाती प्रतिष्ठान, ठाणे यांच्या मार्फत प्रकाश झोतात आणला जात होता. त्यांच्या मार्फत शासन दरबारी प्रयत्न देखील सुरू होते. महाराष्ट्र शासन, पुरातत्व विभाग, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे मराठीमाती प्रतिष्ठान यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर या प्रयत्नांना वंशज रामराजे निंबाळकर यांच्या मार्फत बळ मिळाले. त्यामुळे या गौरवशाली समाधीचा देखील विकास होणार आहे. या साठी मराठीमाती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील, सचिव प्रवीण काळे, खजिनदार सचिन घोडे आणि सर्व विश्वस्त सातत्याने प्रयत्नशील होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *