काटई रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची निविदाप्रक्रिया सुरू, २ नवीन उड्डाणपूल होणार; १२ महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण होण्याचे नियोजन..

| कल्याण | कल्याण – शिळ रस्त्यावरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या दोन रेल्वे उड्डाणपुलांच्या कामांसाठी रेल्वेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सदर निविदेची स्वीकृती मे महिनाअखेरपर्यंत असून काम सुरू झाल्यापासून १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये उड्डाणपूल पूर्ण करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे नियोजन असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सांगितले.

कल्याण-शिळ रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून दररोज सदर मार्गावरून शेकडो अवजड वाहने ये – जा करीत असतात. सदर काटई पूल अरुंद असल्यामुळे या मार्गावर एखादा अपघात झाल्यास संपूर्ण मार्ग ठप्प होतो, त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना देखील नाहक त्रास सहन करावा लागत असतो, तसेच, शिळ – कल्याण रस्त्यावरील पलावा परिसरातील वाहतूककोंडी दूर होण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास (जीएडी) रेल्वेने मंजुरी दिल्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. काटई रेल्वे उड्डाणपूल व्हावा, याकरिताही कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सातत्याने पाठपुरावा करीत होते.
शिळ-कल्याण रस्त्याच्या सहा पदारीकरणाचे काम प्रगतीपथावर असून याचाच एक भाग म्हणून पलावा गृहसंकुल परिसरात देसाई खाडी ते काटई टोल नाका अशा उड्डाणपुलाचे कामही सुरू करण्यात आले होते. परंतु, काही तांत्रिक कारणास्तव या उड्डाणपुलाचा आराखडा बदलावा लागला असून सदर प्रस्ताव रेल्वेकडे सादर केला होता आणि त्यासही मंजुरी मिळवण्यात खा. डॉ. शिंदे यांना यश प्राप्त झाले आहे.

एमएसआरडीसीकडून येत्या काही महिन्यांत जुन्या काटई रेल्वे पुलाला लागून शिळफाट्याच्या दिशेने ये – जा करण्याकरिता वाढीव मार्गिका तयार करण्यात आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यासाठी वर्षभराहून अधिक कालावधी लागणार आहे. या मार्गिका तयार झाल्यानंतर रेल्वे प्रशासन येथील जुना रेल्वे उड्डाणपूल निष्कसित करणार असून त्याठिकाणी नवा रेल्वे उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना एकूण आठ मार्गिका ये – जा करण्याकरिता उपलब्ध होणार असून प्रवाशांना वाहतूक कोंडीतून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल, असा विश्वासही खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *