
ठळक मुद्दे :
• थेट बाधित भागात १९०-२४० कुटुंबीयांना मदत
• धान्य, किराणा, भांडी, साड्यांसह ३२ वस्तूंचे १६००-१८०० रुपयांचे मदत किट केले सुपूर्द.
• आरोग्य प्रबोधन, स्वच्छता मोहीम राबवून लोकांपर्यंत पोहोचवली मदत
• गावकऱ्यांनी केला मराठीमाती प्रतिष्ठान व समाजभान संस्थेचा सत्कार
• मराठीमाती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे गावाने मानले आभार
| मुंबई | गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्याने बऱ्याच ठिकाणी अनेक शहरांची, गावांची अक्षरशः दुर्दशा केली आहे. महाड शहर तसेच महाड परिसर, खेड, चिपळूण, सांगली, कोल्हापूर आदी परिसरात महापुराचा फटका बसल्याने जनजीवन अत्यंत प्रभावित झाले आहे. या परिस्थितीत माणुसकीचा हात देण्यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून अनेक स्वयंसेवी संस्था पुढाकार घेताना दिसत आहेत.
महाड परिसरात देखील महापुराने सगळच उध्वस्त केले आहे. दोन नद्यांच्या मध्ये सापडलेल्या ढालकाठी, बिरवाडी, भावे, वरंध या महाड तालुक्यातील पट्ट्यात देखील अनेकांना या महापुराचा भयंकर फटका बसला आहे. त्यामुळे या पट्ट्यातील नागरिकांना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखली काम करणाऱ्या मराठीमाती प्रतिष्ठान व जालना येथील समाजभान प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कर्तव्यपूर्ती म्हणून मदत करण्यात आली.
भावे या गावातील जाधव वाडी, पोळ वाडी, आदिवासी वाडी, सुतार वाडी, बौद्ध वाडी, चौधरवाडी, गुरव वाडी, वजरवाडी आदी तसेच ढालकाठी मधील भागात मराठीमाती प्रतिष्ठान व समाजभान संस्था यांच्या माध्यमातून थेट बधितांच्या घरी मदत पोहचवण्यात आली. यावेळी समाजभान संस्थेचे दादासाहेब थेटे, मराठीमाती प्रतिष्ठानचे प्राजक्त झावरे पाटील, पोलीस अधिकारी बन्सी कांबळे, विक्रीकर अधिकारी अतुल आवटे, सचिन घोडे, निलेश मोरे, प्रतिक रेपाळे, प्रवीण काळे, रामभाऊ इंगळे, सोपान पाष्टे, शंकर बोबडे आदी सदस्य उपस्थित होते.
काय होते या किट मध्ये :
किराणा, औषधी, स्वच्छ्ता सामुग्री, महिलांसाठी साडी, ब्लँकेट, टॉवेल, इनर वेअर, सुका खाऊ, फळे, भांडे, धान्य अश्या विविध ३२ वस्तूंचे जवळपास १६००-१८०० रुपयांचे किट यावेळी या संस्थांमार्फत जवळपास १९० ते २४० कुटुंबांना देण्यात आले.
शिक्षक, सरकारी कर्मचारी यांना देखील आधार:
शिक्षक, सरकारी कर्मचारी हे देखील या परिस्थितीने बाधित आहेत. परंतु ते मदत स्वाभिमानापोटी मदत घेण्यासाठी जात नाहीत. ते देखील या परिस्थितीच्या फटक्यात सापडले असल्याने त्यांना देखील मराठीमाती प्रतिष्ठान व समाजभान संस्था यांच्या मार्फत सहाय्य करण्यात आले. तसेच ३५० पाणी बॉक्स त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले.
गावकऱ्यांकडून कौतुक :
मदत देण्यासाठी बऱ्याच संस्था येतात परंतु त्या वर वर पाहून मदत करून निघून जातात. परंतु या दोन्हीही संस्थांनी आमच्या बाधित गावात मुक्काम करून आमच्या समस्या लक्षात घेऊन थेट भरघोस मदत केली, त्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी त्यांच्या सत्कार देखील केला. त्यांना बळ देणाऱ्या मार्गदर्शक खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो.
– सौ. आशा जाधव, सरपंच भावे ग्रुप ग्रामपंचायत
स्थानिक शिक्षकांनी केले नियोजन :
मराठीमाती प्रतिष्ठान, ठाणे व समाजभान संस्था, अंबड यांनी केलेले जीवनावश्यक साहित्य वाटप, आरोग्य प्रबोधन, स्वच्छ्ता अभियान याचे नियोजन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे पदाधिकारी व स्थानिक जिल्हा परिषद शाळेतील अमोल बुधवंत यांनी केले. तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अमोल माने, मंदार रसाळ, राकेश सकपाळ, शिंदे सर, पारटवाड सर, एकनाथ सरड, संदीप पारडे आदी यांनी मदत केली.
” आम्हाला मिळालेला निधी आणि देणगीदार यांनी टाकलेला विश्वास सार्थकी ठरविण्यासाठी खऱ्या गरजवंतांच्या थेट घरी पोहचून आम्ही मदत सुपूर्द केली. दोन्हीही संस्थांचे सदस्य यांनी या काळात घेतलेल्या अपार मेहनतीमुळे केवळ हे शक्य झाले. “
– श्री. दादासाहेब थेटे, अध्यक्ष समाजभान संस्था
” सामजिक कामांचा हा वारसा आम्ही सक्षमपणे आणि नेटाने पुढे नेत राहू. प्रत्येक देणगीदाराचा तथा प्रत्येक बधितांचा आम्हावरील विश्वास नेहमीच वृध्दींगत करत राहू. आमचे मार्गदर्शक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांची प्रेरणा आणि सातत्याने कार्यमग्न राहण्याची विचारधारा आम्ही जपत राहू. आपण सर्व फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. “
– प्राजक्त झावरे पाटील, अध्यक्ष मराठीमाती प्रतिष्ठान