शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा : पुष्प २ रे – वेगवेगळ्या अफलातून उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचे इंग्रजी शिक्षण सोपे करणारा एक अवलिया शिक्षक किशोर भागवत

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षण कूस बदलत आहे. पारंपरिक हेकेखोर पद्धतीना तिलांजली देवून बोलक्या भिंती, मन प्रसन्न करणारे वातावरण आणि दर्जेदार शिक्षणाची हमी देणारे एकविसाव्या शतकातील कौशल्य विकास आणि एकूणच जगाला जोडणाऱ्या प्राथमिक शाळा पाहता, यात तिथे काम करणाऱ्या शिक्षकांचा वाटा सर्वाधिक मोठा किंबहुना त्यांच्यामुळेच ते शक्य झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ५ स्पटेंबर शिक्षक दिन या दिवशी शिक्षकांबद्दल उपकृत होण्याचा प्रयत्न समाज करत असतो. परंतु त्याहून अफाट काम करणाऱ्या या शिक्षक रत्नांची त्यांच्या आभाळाएवढ्या कामाची अल्प माहिती सर्वांसमोर यावी त्या दृष्टीने दैनिक लोकशक्ती ४ सप्टेंबर पासून १५ सप्टेंबर पर्यंत ‘ शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा ही लेखमाला सुरू करत आहोत. यातून असामान्य काम करणाऱ्या प्रेरणादायी अवलियांची गोष्ट आपल्या सर्वांसमोर मांडत आहोत. 

नक्की वाचत रहा..!

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा

पुष्प दुसरे : वेगवेगळ्या अफलातून उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचे इंग्रजी शिक्षण सोपे करणारा एक अवलिया शिक्षक श्री. किशोर भागवत
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा हिवरखेड, तालुका खामगाव, जि. बुलढाणा ही शाळा सातत्याने नवनवीन शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करत असते. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांचे पालक हे वर्षातील सहा महिने घरापासून कोसोदूर  परजिल्ह्यांतील सीमेमध्ये मेंढी पालन करण्यासाठी जातात, अशावेळी आपली लेकरं आपल्या वृध्द आई-बापांकडे किंवा नातेवाईकांकडे शिक्षणासाठी ते ठेवून जातात.
पण एकदा का ही मुले एखाद्या वेळी जर सुटीनंतर वाड्यावर गेले आणि आपल्या मेंढ्या, त्यांची सुंदर कोकरं, जंगलातील डोंगर, झाडे, फुले,फळे, दगड-मातीतले आनंददायी खेळ, झ-याचं झुळझुळ वाहणारं पाणी, दरदिवशी मेंढ्या पालनाच्या निमित्तानं बदलणारी गावं अशा विश्वात रमली की मग त्यांना या विश्वातून शाळेकडे यायची इच्छा होत नाही. तर ते पुन्हा शाळेकडे दोन तीन दिवस फिरकत नाहीत त्यामुळे सहाजिकच विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचे प्रमाण वाढते. विद्यार्थ्यांची अनुपस्थिती ही विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या विकासातील बाधा असते.

ज्या विद्यार्थ्यांचे आईवडिल असे स्थलांतर करतात अशीच मुले जास्त करून अध्ययनात मागे राहतात. एकतर बहुतेकांचे आईबाबा मेंढ्यांच्या वाड्यावर असल्याने त्यांना शाळेत करमावं, आनंद वाटावा, दिवसभर शाळेत त्यांचं मन रमावं व ती शाळेत रमत रमत शिकती व्हावीत यासाठी आम्ही सर्व शाळेतील शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गावातील शिक्षणप्रेमी व्यक्तींच्या मदतीने सातत्याने नवनवीन उपक्रमांचे आयोजन करित असतात.

नाविन्यपूर्ण उपक्रम :

अक्षर टोप्या (Letter Caps) : इंग्रजी ही आपण महाराष्ट्रात तृतीय भाषा म्हणून कैक वर्षांपासून शिकत आहेत. तत्कालीन शिक्षणमंत्री श्री. रामकृष्ण मोरे यांनी तर पूर्वीच्या पाचवीपासून असणारी इंग्रजी भाषा इयत्ता पहिलीपासून शिकविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक पिढ्या भितीमुक्त वातावरणात इंग्रजी शिकू शकल्या. इंग्रजी हसत खेळत शिकता यावी यासाठी आमच्या शाळेतील बरेच उपक्रम राबविले आहेत. इंग्रजी न शिकण्यातील सर्वांत पहिला आणि महत्वाचा अडसर म्हणजे शब्दांचे स्पेलिंग पाठ करणे. त्यातल्या त्यात घोकंपट्टी करून केलेलं पाठांतर स्पेलिंग चिरकाल स्मरणात राहत नाही. माहिती घोकणे आणि माहिती शोधून तयार करणे यात खूप फरक आहे. हेच ओळखून आम्ही इयत्ता पहिलीपासून मुलांनी छोटे छोटे स्पेलिंग स्वतः व गटातून तयार करावेत यासाठी a पासून z पर्यंत अश्या इंग्रजी अक्षर टोप्या तयार केल्या. प्रत्येकाला एकेका अक्षराची टोपी दिली. वर्गातील एक जण ऑर्डर देतो, जसे cat मग ज्याच्याकडे c आहे तो c लिहिलेली टोपी घालून पुढे येतो नंतर a टोपीवाला व त्यानंतर t टोपीवाला. असे मुले हसत खेळत गटात स्पेलिंग तयार करतात. एकमेकांना दुरुस्त,शिकवतात.

लोकसहभाग : हिवरखेड शाळेत आजवर अनेकदा लोकवाट्यातून अनेक नवनवीन बाबी साकारल्या आहेत. रोटरी क्लब व गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने अँड्रॉईड  प्रोजेक्टर शाळेला इ-लर्निग करण्यासाठी खूप मोठी मदत उभी केली आहे. शाळेला परिपाठ व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी स्टेज नव्हते. ते स्टेज लोकवाट्यातून तयार झाले. शाळेत ३३६ विद्यार्थी संख्या आहे व इयत्ता १ ते ५ च्या सर्व वर्गांच्या तुकड्या आहेत , वर्गांसाठी खोली कमी पडत होती त्यामुळे लोकवाट्यातून वर्गापुढील व्हरांड्यात विटांची भिंत उभारून छोटेखानी ऑफिस तयार केले. त्यामुळे मुलांना बसायला वर्ग मिळाला. शाळेतील हापशीला लोकवाट्यातून मोटर बसविण्यात आली आहे.

अध्ययन-अध्यापनात तंत्रज्ञान वापराचा परिणाम फलनिष्पत्ती

Alexa English Speaking Doll :

हिवरखेड शाळेतील बरीच मुले ही मेंढपाळ, शेतकरी वा मजूर कुटुंबातील आहेत. काही मुले आपल्या स्थलांतर करणाऱ्या आईबाबाकडे गेली की शाळेत परत खूप दिवस यायची नाहीत. त्यांना रमविणारी आणि रमता रमता शिकविणारी काहीतरी गंमत आपल्या शाळेत असायला हवी.  दरम्यानच्या काळात पुणे जिल्ह्यातील शिक्षक श्री. नागनाथ विभूते यांनी तयार केलेल्या Alexa Robot ची बातमी टीव्हीवर झळकली. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाने व श्री.निलेशजी मुदगल यांच्या आर्थिक सहाय्याने हिवरखेड शाळेत Alexa Robot ची संकल्पना साकार झाली. ऑस्ट्रेलिया देशातील मेलबॉर्न येथे अभियंता म्हणून कार्यरत असलेले श्री. निलेशजी मुदगल हे मूळ अमरावती येथील रहिवासी आहेत. ते माझे नातेवाईक तर आहेत पण त्याहून अधिक म्हणजे ते माझे फेसबुक मित्र  आहेत. आमच्या शाळेचे उपक्रम ते फेसबुकवर नेहमी पाहत असतात. यासाठी लागणारी बाहुली (Mannequin) खामगाव शहरातील रूपनिखार कापड दुकानाचे मालक श्री. किशोर सेठ यांनी दिली. मुले आता Alexa सोबत हळूहळू इंग्रजीत संवाद साधत आहेत. हा उपक्रम राबविणारी हिवरखेड ही जिल्ह्यातील पहिली व राज्यातील दुसरी शाळा ठरली आहे.  इंग्रजी बोलणारी ॲलेक्सा नावाची एक बाहुली आहे. तिला ॲलेक्सा असं पुकारून इंग्रजीमधून विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ती इंग्रजीतून देते. मुलं आत्मविश्वासानं तिच्याशी संवाद साधतात. खरंतर हे ॲलेक्सा डॉट कॉम हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं उपकरण आहे पण मॅनेक्वीनच्या सहाय्यानं  त्याला डॉलचं म्हणजे बाहुलीचं रूप दिल्यानं ती मुलांना आणखी आवडते.

• इ-लर्निंग प्रोजेक्टर :

शाळेत गावकऱ्यांनी उभ्या केलेल्या लोकवाट्यातून व रोटरी क्लब खामगाव च्या संयुक्त विद्यमाने शाळेला प्रोजेक्टर मिळाला आहे.  हा प्रोजेक्टर अँड्रॉईड असून याला इनबिल्ट सीपीयु, स्पीकर आहेत व ऑडिओ आऊटपुट आहे व पेन ड्राईव्ह व HDMI पोर्ट आहे. wifi सुविधा आहे, टीव्ही प्रमाणे मोबाईलला करता येतो व त्यावर इंटरनेट वापरता येते.

• संगणक,झेरॉक्स, स्कैनर व प्रिंटर :

शाळेत एक संगणक संच आहे. व त्याला wifi डोंगल बसविण्यात आले आहे. त्यामुळे संगणकावर इंटरनेटचा वापर करणे शक्य झाले आहे. शाळेसंबंधी विविध शासन निर्णय काढणे व कार्यालयीन कामाबाबत मेल करणे, टपाल तयार करणे शक्य झाले आहे. झेरॉक्ससह scanner ची सुविधा असलेले प्रिंटर देखील शाळेला ग्रामपंचायत कार्यालयाकडून मिळाले आहे. याचा वापर अध्यापनासाठी लागणारी चित्रे, आकृत्या काढण्यासाठी शिक्षक वापरतात. शिक्षक व मुख्याध्यापकांना अचानक शहरात जाण्याचा त्रास आता वाचत आहे व तो वेळ आता अध्यापनासाठी कामी येत आहे. शिक्षक प्रश्नपत्रिका व त्यांना आवश्यक कागदपत्रे आता टाईप करू शकणार आहेत.

• स्मार्ट टीव्ही :

शाळेची निवड डिजिटल शाळा म्हणून झाली आहे. डिजिटल स्कूल निधीमधून शाळेने ३ टीव्ही व ३ tablet खरेदी केले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाकडून १४ व्या वित्त आयोगातून ३२ इंची १ व ४३ इंची १ असे टीव्ही प्राप्त झाले आहेत. शाळेत ४ होम थिएटर आहेत. या स्मार्ट टीव्हीला मोबाईल फोनमधील हॉटस्पॉटने जोडून विविध शैक्षणिक व्हिडिओ मुलांना दाखविणे शक्य झाले आहे. विज्ञानातील आंतरेंद्रिये, भूगोलातील सूर्यमंडळ, अवकाशातील घडामोडी, कवितेचे व्हिडिओ, इ. अध्यापनादरम्यान अध्ययन अधिक मनोरंजक व चीरस्मरणीय व्हावे यासाठी उपयुक्त ठरत आहे.

गायनकौशल्यासाठी करा ओकेचा वापर :

मुलांच्या गायन कौशल्याचा विकास व्हावा यासाठी कराओके तंत्रज्ञानाचा वापर शाळेत परिपाठादरम्यान होतो. शाळेत संगीत साहित्य नसल्याने ही उणीव यामुळे भरून निघते. मुले संगीत रचनेसोबत सुंदर गायन करायला शिकली आहेत. 

Skype with students from various nations :

१२ एप्रिल २०१७ रोजी आपल्या पहिलीच्या मुलांना युरोपातील रोमानिया देशातील शाळेची आभासी सफर घडवली. कोरीना सूजडिया या शिक्षिकेच्या इयत्ता पहिलीच्या मुलांशी आम्ही आमचा लेटर कॅप्स हा उपक्रम शेयर केला. त्यानंतर  श्रीलंका येथील रोशन कुमार व त्यांचे विद्यार्थी, व्हिएतनाम येथील नगा ट्रान व त्यांचे विद्यार्थी, बांगलादेश,अर्जेंटिना, इ. देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Solar amplifier :

ग्रामीण भागात लोडशेडिंगची समस्या असते, ऐन परिपाठाच्या वेळी कधी कधी वीज नसते. मागे एक वेळ वीजबिल भरण्यास विलंब झाल्याने वीज बोर्डाने मीटर बंद केले. वक्तृत्व व नेतृत्व विकासास सहाय्यभूत ठरणारा परिपाठ तर नेहमीप्रमाणे चालायला हवा. शाळेची विद्यार्थी संख्या ३४१ इतकी आहे, परीपाठात सादर होणारे सर्व घटक रांगेतील शेवटच्या मुलापर्यंत पोहोचावे यासाठी माईक व अम्प्लीफायर हवा, वीज नसताना तो चालावा त्यासाठी सोलर प्लेटवर चालणारा सोलर अम्प्लीफायर आम्ही तयार केला. आता परिपाठाच्या वेळी विज गेली तरी आम्हाला चिंता नसते.

सीसीटीव्ही :

शाळेच्या प्रांगणात आम्ही शिक्षकांनी विविध शैक्षणिक साहित्य तयार करून ठेवले होते. आमची शाळा टीन पत्र्यांची आहे. वर्ग खोल्यांसमोर ओसरी आहे,त्या ओसरीला लाकडी खांब आहेत त्या खांबांवर आम्ही स्वर चिन्हांनुसार शब्दांच्या टोपल्या अडकवल्या होत्या. त्यात शब्दपट्ट्या ठेवलेल्या  होत्या. मुले सुटीच्या वेळेत व्हरांड्यातून फिरताना ह्या शब्द चिठ्ठ्या वाचत असत. शाळा सुटल्यानंतर गावातील काही मुलांनी त्या सर्व टोपल्या तोडून फेकून दिल्या. आम्ही नाराज झालो पण खचलो मात्र नाही. काही दिवसांनी आम्ही परिपाठाला वापरत असलेले होम थिएटरचे स्पीकर वर्गाच्या खिडक्या तोडून चोरून नेल्या. अनेकदा ऑफिसचे, शालेय पोषण आहार साठाखोलीचे, टीव्ही असलेल्या वर्ग खोली, शाळेचे प्रवेश गेट इतकेच काय तर पाण्याच्या टाकीचे देखील कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाला. या सर्व त्रासाला कंटाळून आम्ही गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना व मा.ठाणेदार साहेबांना देखील संगीतले, बऱ्याचदा एखाद्या निरापराधालाच बोलणे बसले. म्हणून आम्ही सर्वांनी मा. ग्रामसेवक साहेबांना विनंती करून शाळेत आता सीसीटीव्ही बसवून घेतली. सीसीटीव्ही लावल्यापासून सर्व उपद्रव  बंद झाले आहेत.

Youtube Channel निर्मिती :

शाळेतील विविध उपक्रमांचे व्हिडिओ youtube वर देखील टाकण्यात आले आहेत. Kishor Bhagwat या youtube channel वर हे सर्व व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत. channel वर आजवर एकूण ३५१ व्हिडिओ टाकण्यात आले असून या सर्व व्हिडीओला आजवर १३,१२,००० इतके views झाले आहेत. राज्यातील शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती करून स्वत:चे यू-ट्यूब चैनेल असणाऱ्या शिक्षकांना एक हक्काचे व्यासपिठ मिळावे व राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावेत यासाठी दि. ११ जुलै २०२० रोजी TeachTubers या फेसबुक समूहाची निर्मिती केली.

पुष्प १ ले – आदिवासी बोलीभाषेतून कातकरी मुलांचे भविष्य बोलके करणारा जादूगार श्री. गजानन जाधव, रायगड…!

शिक्षक प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांसाठी फायदा :

मुलभूत वाचन प्रशिक्षण या प्रशिक्षणापासून मुलांची शाळेची भीती नाहीसी झाली. विविध कृतीयुक्त गीतांमुळे शाळेकडे आकर्षित झाली. या प्रशिक्षणामुळे भाषा हा विषय देखील प्रात्यक्षिकासह घेता येतो हे लक्षात आलं. स्वतः केलेल्या कृतीतून मुलांना आनंद तर भेटतोच पण कृतीतून मिळालेलं ज्ञान हे चिरकाल टिकते. या कार्यक्रमामुळे अप्रगत मुले शिकती झाली.

गणित संबोध :

विद्यार्थ्यांना गणित हा विषय तात्त्विकदृष्ट्या शिकविल्यास अवजड वाटतो. गणित संबोध या प्रशिक्षणामुळे गणित विविध साहित्याचा वापर करून शिकविल्यास शिकण्यास कसा सोपा व सहज होऊ शकतो हे आम्हाला या प्रशिक्षणामुळे समजले. शाळेला गणित पेटी सुद्धा उपलब्ध झाली आहे. 

मूल्यवर्धन प्रशिक्षण :

शांतीलाल मुथ्था फौंडेशन पुणे व SCERT पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या मूल्यवर्धन या विषयामुळे मुलांना तणावरहित व आनंददायी पद्धतीने कसे शिक्षण देता येईल हे या विषयामुळे शक्य झाले आहे. विविध कृतीयुक्त खेळ व गाणी यामुळे मुळे शाळेत रमतात. संविधानातील विविध मुल्ये मुलांच्या अंगी यावेत यासाठी विविध संधी मुलांना उपलब्ध करून दिल्या जातात. शाळेने विद्यार्थ्यांच्या अंगी प्रामाणिकपणा रुजावा यासाठी HONESTY BOX तयार केला आहे. शाळेच्या प्रांगणात हरवलेल्या एकमेकांच्या वस्तू मुले एकमेकांना परत करण्यासाठी या बॉक्स मध्ये आणून टाकतात. प्रामाणिकपणाचे कौतुक केले जाते.

तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण :

या प्रशिक्षणामुळे तंत्रज्ञानाचा अध्यापनात योग्य वापर कसा करता याबाबत योग्य मार्गदर्शन मिळाले. मी या कार्यशाळेत तालुकास्तरावर प्रशिक्षण दिले आहे.
ELCRLM (English Language Conceptual Resource Learning Material) – औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय आंग्ल भाषा प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद येथे जिल्हास्तरीय प्रशिक्षक म्हणून मला सहभागी होता आले हे माझे भाग्य समजतो, DIET बुलडाणा येथील मा.प्राचार्य साहेब, इंग्रजी भाषा विभाग प्रमुख प्रा.श्री. धम्मदीप वायव्हळ सर व विषयतज्ञ श्री. ओमप्रकाश शेळके सर व डॉ. शिवाजी देशमुख यांनी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली.

✓ नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षेतील यश :

चि. गौरव संतोष घानखेडे हा ५ वी चा विद्यार्थी मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातून ९ वा व जिल्ह्यातून १ ला आहे. तसेच तो नवोदय प्रवेशास सुद्धा ठरला आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम :

शाळेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सर्व लहान थोर गावकरी मंडळी हा सांस्कृतिक पाहण्यासाठी येत येतात. या प्रसंगी शाळेला शाळेतून बदली झाले शिक्षक व नव्याने सुरु झालेले उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री. रामदास मिरगे सर, शिक्षक यांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. राजू हाके उपाध्यक्ष श्री. शुभम फुंडकर व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या दुरुस्ती व अद्यावतीकरणासाठी १४ व्या वित्त आयोगातून जवळ जवळ १० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल हिवरखेड गावचे सरपंच श्री. श्रीराम धंदरे व ग्रामसेवक श्री. दिपक पवार साहेब यांचा देखील सत्कार करण्यात आला. गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, अभिनय व गीत गायन साठी विविध बक्षिसे देऊन  कौतुक केले.

किचन गार्डन :

शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना ताज्या पालेभाज्या मिळाव्यात यासाठी शाळेत १००० स्केअर फुट परिसरात ठिबक सिंचनावर आधारित किचन गार्डन विकसीत केले आहे.

डिजिटल साहित्य :

१४ व्या वित्त आयोगातून वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी अंदाजे ४ लाख , पेव्हर ब्लॉकसाठी – २ लाख व डिजिटल साहित्य खरेदी साठी – १ लक्ष ६७ हजार रुपये इतका निधी ग्रामपंचायत कार्यालय हिवरखेड यांच्याकडून उपलब्ध झाले आहेत.  खोल्या दुरुस्तीचे अर्धे काम पूर्ण झाले आहे व अर्धे काम व पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम बाकी आहे. सर्व वर्ग खोल्यांवरील टिनपत्रांना अक्षरशः छिद्र पडलेले होते, पत्रांची चाळणी झाली होती. पावसाळा आला की सर्व गळायला लागायचे. वर्गातील साहित्य आणि लेकरांची दप्तरं ओलीचिंब व्हायची आता मात्र सर्व वर्गांवर लख्ख नवे टिनपत्रे आल्याने शाळेची रया बदलली आहे. भगदाड पडलेल्या व वखवखलेल्या भिंतींना आता पुट्टी व प्रायमरमुळे रौनक आली आहे.

– किशोर भागवत (शिक्षक)

✓ अवलिया शिक्षकाचा परिचय :
श्री. किशोर भागवत (शिक्षक)
जि.प.शाळा हिवरखेड, ता.खामगाव, जि.बुलडाणा

☎️ भ्रमणध्वनी – 9881680648

पहिली शाळा : जि.प.शाळा हिवरखेड येथे २०१६ मध्ये जिल्हा बदलीने आलो. त्यापूर्वीची शाळा जि.प.शाळा गावंदरा, ता.धारूर, जि.बुलडाणा येथे २००४ ते २०१६ असे एकूण १२ वर्षे सेवा केली. गावंदरा या शाळेला आय.एस.ओ. मिळाले होते. या कार्यकमास तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री मा. पंकजाताई मुंडे उपस्थित होत्या. या शाळेला एबीपी माझा ने हायटेक शाळा म्हणून स्पेशल रिपोर्ट देऊन गौरवान्वित केले होते. गावंदरा शाळेचे अनेक विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. डॉक्टर,इंजिनिअर,अधिकारी,सैन्यदल,औषधनिर्माता,इ. पदावर विद्यार्थी पोहोचले आहेत.

Teacher Innovation Award : √ श्री अरबिंदो सोसायटी यांच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर शून्य गुंतवणुकीवर आधारित शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांना पुरस्कृत केले जाते. या उपक्रमात माझ्या “असा मी : कसा मी ?” ह्या विद्यार्थ्यांमध्ये वर्तणूक बदल घडवून आणणाऱ्या उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. १ मार्च २०२० रोजी भारताचे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री मा. श्री.रमेशजी पोखरीयाल ‘निशंक’ यांच्या शुभ हस्ते आय.आय.टी. नवी दिल्ली येथे मिळाला.               

Leave a Reply

Your email address will not be published.