धक्कादायक : राज्यात कोरोना संबंधित पहिला शिक्षकाचा बळी..!

| ठाणे | सध्या महाराष्ट्रात सगळीकडे कोरोनाचा कहर सुरू आहे. या परिस्थितीत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी ,पोलीस आणि शिक्षक प्रत्यक्ष मैदानावर लढत आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र प्राथमिक शिक्षकांना वेगवेगळी कामे असून सर्व शिक्षक या लढ्यात सहभागी आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात देखील गेल्या ३५-३६ दिवसापासून कोणत्याही सुट्टी शिवाय शिक्षक हॉटस्पॉट क्षेत्रात जावून सर्वेक्षण करत आहेत.  हेच सर्वेक्षण करत असणारे शिक्षक साजिद अख्तर ए माजीद हे आज कोविड सर्वेक्षण पूर्ण करून कुर्ला येथील घरी परतत असताना त्याांचा विक्रोळी इथे अपघाती मृत्यू झाला आहे. 

ठाणे महापालिकेच्या १८ आरोग्य केंद्रांवर हे शिक्षक आरोग्य सहायक या नव्या भूमिकेत कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय घरोघरी जावून सर्वेक्षण करत आहेत. बऱ्याच आरोग्य केंद्रावर आवश्यक सुरक्षा कीट मधील मास्क व ग्लोज उपलब्ध होत नसल्याबाबत वेळोवेळी तक्रारी करून देखील त्या मिळत नाहीत. तसेच नैसर्गिक नियमाने सुट्टी मिळणे मानसिक स्वास्थ टिकविण्यासाठी महत्वाचे आहे , परंतु आरोग्य विभाग प्रशासन लक्ष देत नसल्याची तक्रार होत आहे.

 वास्तविक पाहता शिक्षकांना हक्काची उन्हाळी सुट्टी लागू झाली असून देखील ते कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या किमान माफक अपेक्षा देखील पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. याचा ताणतणाव अधिकचा असल्याने शिक्षक मानसिक त्रासात असल्याचे दिसून येत आहे. त्यात अशी दुर्दैवी घटना घडल्याने चिंतेचे वातावरण शिक्षक वर्गात पसरले आहे. 

साजिद अख्तर यांच्या अपघाती मृत्यू मधून तरी महापालिका प्रशासन जागे होणार का..? हा यक्ष प्रश्न आहेच. शिक्षकांना आरोग्य कर्मचारी यांच्याकडून मिळणारी वागणूक, अपुऱ्या सुरक्षा कीट आणि सततचे काम यांनी शिक्षक थकले आहेत. त्यात त्यांना कोणतेही विमा संरक्षण दिले जात नाही या सर्व बाबतीत प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.

दरम्यान ,  ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे बाबाजी फापाळे, राजेंद्र निकम यांनी या अपघाती मृत्यूबाबत तीव्र वेदना व्यक्त करत आयुक्त, महापौर यांच्याकडे पुणे महानगरपालिकेप्रमाणे १ कोटींच्या विम्याची तसेच एका कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपा तत्वावर महापालिकेत नोकरी देण्याची मागणी केली आहे  तसेच गेली ३०-३५ दिवस काम करणाऱ्या मनपा शिक्षकांऐवजी खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक यांना काम दिले जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. संघटना या संकट काळात शासनसोबत तर आहेच परंतु शासनाने देखील त्यांच्या अत्यावश्यक तक्रारारींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी दैनिक लोकशक्तीशी बोलताना सांगितले आहे.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *