ठाणे मनपाला आर्थिक घरघर..!

| ठाणे | मार्च अखेरीस सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसांच्या जीवाचे हाल सुरू आहेत. सर्वच थरातील नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर आधारित असलेल्या ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती देखील बिकट झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने आपल्या विविध बँकेत असलेल्या ठेवी मोडून खर्च भागवण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महापालिकेला या एफडी मोडल्याने मिळणा-या व्याजाला मुकावे लागणार आहे.

एकीकडे आर्थिक वर्षाचा शेवट, त्याच काळात सुरू झालेला लॉकडाऊन आणि आर्थिकमंदी यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी मार्च अखेरपर्यंत भरला नाही. त्यामुळे मागील वर्षाची अखेरची तिमाही आणि या वर्षाची सुरवातीच्या तिमाहीत उत्पन्न मिळाले नाही. त्याचा परिणाम महापालिकेच्या सर्व कामावर झाला आहे. सर्व विकासकामे बंद असून शेकडो करोडो रुपये बिल देणे प्रलंबित आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी कंत्राटदार आंदोलन देखील करत होते.

दरम्यान आता महापालिकेला पूर्णपणे जीएसटीच्या येणा-या पैशावर असून कोरोना संकट गेल्यावर महापालिकेला आर्थिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ठाणे महापालिकेचे वेगवेगळे विभाग असून त्यांना प्रत्येक आर्थिक वर्षात उत्पन्नाचे उद्दिष्ट ठरवून दिलेले असते. परंतु यातील काही विभाग निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचे या पूर्वी दिसून आले आहे. त्यात आता कोरोना आणि लॉकडाऊनची भर पडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु असून सर्व व्यवहार बंद आहेत. परिणामी महापालिकेच्या तिजोरीत शून्य रुपये जमा झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *