शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा: पुष्प ७ वे – वेगवेगळ्या अफलातून उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचे शिक्षणं अधिकाधिक आनंदी करणाऱ्या बहुआयामी शिक्षिका श्रीमती वैशाली भामरे..

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षण कूस बदलत आहे. पारंपरिक हेकेखोर पद्धतीना तिलांजली देवून बोलक्या भिंती, मन प्रसन्न करणारे वातावरण आणि दर्जेदार शिक्षणाची हमी देणारे एकविसाव्या शतकातील कौशल्य विकास आणि एकूणच जगाला जोडणाऱ्या प्राथमिक शाळा पाहता, यात तिथे काम करणाऱ्या शिक्षकांचा वाटा सर्वाधिक मोठा किंबहुना त्यांच्यामुळेच ते शक्य झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ५ स्पटेंबर शिक्षक दिन या दिवशी शिक्षकांबद्दल उपकृत होण्याचा प्रयत्न समाज करत असतो. परंतु त्याहून अफाट काम करणाऱ्या या शिक्षक रत्नांची त्यांच्या आभाळाएवढ्या कामाची अल्प माहिती सर्वांसमोर यावी त्या दृष्टीने दैनिक लोकशक्ती ४ सप्टेंबर पासून १७ सप्टेंबर पर्यंत ‘ शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा ही लेखमाला सुरू करत आहोत. यातून असामान्य काम करणाऱ्या प्रेरणादायी अवलियांची गोष्ट आपल्या सर्वांसमोर मांडत आहोत. 

नक्की वाचत रहा..!

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा

पुष्प सातवे : वेगवेगळ्या अफलातून उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचे शिक्षणं अधिकाधिक आनंदी करणाऱ्या बहुआयामी शिक्षिका श्रीमती वैशाली भामरे..
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

वैशाली भामरे यांना सुरुवातीपासूनच शिक्षिका होण्याचा मनोदय होता. डी एड नंतर लगेचच औरंगाबाद जिल्हा परिषदेत २००३ मध्ये रुजू झाल्या. तेथे उत्कृष्ट काम केल्यानंतर नाशिक जिल्ह्यात जि प शाळा हाताने तालुका मालेगाव येथे २००९ मध्ये बदली झाली. शाळा निर्लेखित असल्याने ग्रामपंचायतीच्या वर्गखोल्या मिळाल्या. शाळेचे अंतरंग व बाह्यरंग बदलणे आवश्यक होते. मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत अधिक लक्ष दिल्याने मुलांमधील झालेला बदल बघून पालकांचा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला. त्यांच्या मदतीने शाळा व भिंती बोलक्या झाल्या. शालेय परिसरात त्यावेळी एकही झाड नव्हते आणि म्हणूनच सहकाऱ्यांच्या मदतीने एक मुल एक झाड योजना राबवली आणि शाळा हिरवीगार झाली. लोकसहभागातून झाडांसाठी संरक्षक जाळ्या, राष्ट्रपुरुषांचे फोटो, बसण्यासाठी बेंच , संगणक, एलइडी स्मार्ट टीव्ही, साहित्य ठेवण्यासाठी रॅक, वाचनालयासाठी पुस्तके, दफ्तर व लेखनसाहित्य इत्यादी वस्तू मिळाल्या मुलांच्या कलागुणांचा विकास व्हावा यासाठी रंगमंच तयार करून घेतला. यासाठी नातेवाईक व मित्रपरिवार आणि लोकसहभाग यातून सुमारे तीन लाखापर्यंतचा निधी मिळाला. बाह्यरंग सुंदर झाल्याने कामाचा वेग वाढला. अल्पावधीत नावीन्यपूर्ण उपक्रमांनी शाळा लौकिकास आली व उपक्रमशील शाळा म्हणून शाळेची निवड झाली. विविध स्पर्धांमध्ये मुले चमकू लागली. शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील विद्यार्थी राज्यात दुसऱ्या व चौथ्या क्रमांकाने यशस्वी झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत जिल्हास्तरावर नृत्य, चित्रकला, गायन स्पर्धेत विद्यार्थी यशस्वी झाले.

वाचन संस्कृती :

मुलांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत असते म्हणून रद्दीतून वाचनालय हा अभिनव उपक्रम राबविला. जुन्या वह्यांच्या पानांवर कात्रणे चिटकवून बाईंडींग केले. मुखपृष्ठावर साजेसं चित्र लावले आणि कमी खर्चात पुस्तक तयार करण्यात आले, अशा तीस पुस्तकांचा संच वाचनकट्ट्यासाठी करण्यात आला. यातून भाषेसोबत कापणे, चिटकवणे ही कौशल्य आत्मसात झाली. मजकूर वाचू लागल्यामुळे त्यातून आपले विचार मांडण्याची लेखनाची आवड निर्माण झाली.

गणिताशी मैत्री :

गणित प्रश्नमंजुषा ,पाढ्यांची माळ, पाढ्यांच्या भेंड्या व तारखेनुसार पाढा यातून पाढे सोपे झाले. इंग्रजीची भीती कमी करण्यासाठी चेनड्रील, लॅडर गेम, हॉटसीट, रन टू ब्लॅक बोर्ड, स्पेलिंग गेम अशा ऍक्टिव्हिटीचा योग्य वापर केल्याने मुले इंग्रजी बोलू लागली, वाचू लागली. मुळाक्षरांचे मुकुट, मुळाक्षरांचा वाढदिवस, अक्षर रांगोळी, शब्दखेळ गाणी, गोष्टी, पपेटचा वापर ह्या भाषिक उपक्रमामुळे पहिलीतच मुलांचा पाया पक्का झाला.

हस्तकला विकास :

कार्यानुभव कक्ष स्थापन केला. त्यात भेटकार्ड, आकाश कंदील, पुष्पगुच्छ, पेन स्टँड, चॉकलेट कागदापासून हार, फुलपाखरे ,राख्या, शिवणकामाच्या विविध वस्तू, बाटल्यांचे झुंबर, फुलदाणी पुठ्यापासून वस्तू बनवल्या. यातून स्वनिर्मितीचा आनंद आणि श्रमप्रतिष्ठेची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. ह्या वस्तूंचे वेळोवेळी प्रदर्शन भरवून विद्यार्थी समाजाच्या कौतुकास पात्र ठरले.

गावासाठी योगदान :

गुणवत्तेवर काम करत असताना निराशा निमित्ताने गावातील महिलांची परिस्थिती अनुभवली. निराशेची भाग्यश्री झाली. त्यासाठी माता पालक मेळावा, उखाणे स्पर्धा, अभंग , भजन गायन स्पर्धा, क्रीडा स्पर्धा यांचे आयोजन केले. मुलींना बरोबरीचे शिक्षण मिळावे यासाठी महिलांना मार्गदर्शन केले. महिलांची आर्थिक स्थिती बदलण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून प्रयत्न केले. आज आठ ते दहा बचत गट सक्षम रित्या गावात कार्यरत आहेत. महिला दिनाच्या दिवशी गावाच्या प्रगतीसाठी कार्य केलेल्या महिला सरपंच, अंगणवाडी सेविका, बचत गट अध्यक्ष, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेविका व आधार नसताना मुलांना घडविणार्‍या मातांचा सन्मान समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून आयोजित केला. त्यामुळे त्यांच्यात परिवर्तन झाले.

कृतीप्रधान अध्ययन :

ज्ञानरचनावाद व तंत्रज्ञान यांचा प्रभावी वापर सुरू केला. बोलो अँप, दिक्षा अँप, हॅलो अँप यासारख्या शैक्षणिक अॕप्सचा वापर, मर्ज क्यूब, अँनिमल 4D यांच्या साह्यायने अवकाश जगत व प्राणीजगताची ओळख करून दिली. मुले स्वतः व्हिडिओ निर्मिती करू लागली. QR कोड तयार करु लागले. अशी त्यांची हाताने शाळा गावकरी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष मोठाभाऊ बिरारी सर्व शिक्षक सहकारी यांच्या साथीने नावारूपास आली.

सकारात्मक बदल :

प्रशासकीय बदली जून २०१९ मध्ये माणके येथे झाली. भौतिक दृष्ट्या समृद्ध असलेल्या ह्या शाळेत विद्यार्थी अनुपस्थितीचा व स्थलांतरितांचा प्रश्न जाणवला. त्यासाठी पालकांची मनस्थिती बदलणे गरजेचे म्हणून पालकांचा व्हाट्सअप गृप तयार केला. त्यांना शाळा आपलीशी वाटावी म्हणून पालक मेळाव्याचे आयोजन केले. महिलांचीही बैठक घेतली .”शाळेला गावाचा आधार व गावाला शाळेचा अभिमान वाटावा” अशी वाटचाल शाळेची होण्यासाठी त्यांचा सहभाग किती महत्वाचा हे पटवून दिले .यामुळे उपस्थिती वाढली. परिपाठाच्या वेळी खेळ घेऊ लागलो यामुळे मुले परिपाठालाच हजर राहू लागली.

उपक्रमांची साथ :

वॉटर हार्वेस्टिंग, वृक्षदिंडी काढून वृक्षरोपन, दप्तरमुक्त शनिवार, परसबाग, माईंड मॅप ह्या उपक्रमांनी शाळा बदलांचे साक्षी ठरली. ग्रामपंचायतीकडून साऊंड सिस्टिम मिळवली व संगीतमय परिपाठ सुरु केला. स्वच्छ व नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या “स्टार ऑफ द वीक” म्हणून गौरव सुरु केला. माझा आजचा फळा हा उपक्रम प्रभावी ठरला. यात आजची दिनांक, वार, दिनविशेष, म्हण, वाक्प्रचार, शब्द, अंक, अक्षर, आकार, आजचे चित्र असे लिहून बाहेर ठेवला जातो. क्षेत्रभेटीच्या आयोजनामुळे मुलांचे अनुभव विश्व वाढून चौफेर ज्ञान मिळाले. विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या व्यक्तींशी चर्चा व मुलाखतींचे आयोजन, संगीत कवायत, योगासने पथक, लेझीम पथक तयार केले. या पथकासाठी इंडियन Nx व राजधानी यांच्याकडून मोफत ड्रेस मिळाला. कस्तुरी स्टोअर्स यांच्याकडून २०० pages २०० वह्या या मुलांना मिळाल्या.

गौरव कार्याचा :

शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेत. यासाठी तीन मुलांना “महाराष्ट्रभूषण” व भामरे मॅडम यांना “महाराष्ट्ररत्न” हा सन्मान शासन व सलाम मुंबई फौंडेशन यांच्याकडून प्रदान करण्यात आला. ह्या वर्षी डिझाइन फॉर चेंज याअंतर्गत मुलांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिले. मुलांनी नैवेद्यातुन वाया जाणाऱ्या अन्नाविषयी प्रबोधन केले.आषाढ महिन्यात सरपंच विजयाताई देवरे यांच्या मदतीने पथनाट्यातून महिलांना वाया जाणाऱ्या अन्नाची जाणीव करून दिली व महिलांनी जमा केलेला कोरडा शिधा गावातील गरीब व गरजू कुटूंबास दिला. यातुन खरी ईशसेवा केल्याचा आनंद सर्वाना मिळाला. यासाठी आदरणीय विस्ताराधिकारी दिलीप नाना पवार, केंद्रप्रमुख अशोक राठोड साहेब ,मुख्याध्यापक योगेश शेवाळे सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. सहकारी शिक्षिका दिपाली शिंदे यादेखील तितक्याच तळमळीने या कामात मदत करत असतात येथील विद्यार्थ्यांनीही चित्रकला, नृत्य, रांगोळी स्पर्धेत यश मिळवले.

वसा सवित्रीचा :

“ना पालखीत, ना घोड्यावर, आमची मिरवणूक आई वडील, पालकांच्या कडेवर” असे म्हणत मुलींना कडेवर बसवून मिरवणूक काढली , मुलींच्या नावाची पाटी त्यांच्या घरावर लावली, मुलींसाठी कराटे मार्गदर्शन यासारखे छोटे छोटे उपक्रम मुलींचे भाव विश्व फुलविण्यासाठी , शारीरिक मानसिक वाढ योग्य होण्यास पूरक ठरले. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या माता निरक्षर आहेत त्यांच्यासाठी “जागर शिक्षणाचा” हा सावित्रीचा वसा मुलींनी घेऊन रोज संध्याकाळी त्यांना त्या शिकवतात. नंतर शिकलेल्या आई व मुलीचा सन्मान करण्यात येईल. येथेही महिला सक्षमीकरणाची कास धरत बचतगटाविषयी मार्गदर्शन केले. यामुळे दोन बचतगट सुरु झालेत.प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते असे म्हणत त्याच उत्साहाने व चिकाटीने माणके शाळेतही कामकाज सुरु केले व बदल घडवून आणला.

कौतुकाची थाप :

श्रीमती भामरे यांना यावर्षी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला असून याधीही अनेक संस्थांचे त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. विधायक संदेशातून विवेकी समाज घडविण्याच्या उद्देशाने आयोजित स्पर्धेतील यशासाठी आदरणीय मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सन्मान ,इयत्ता चौथीच्या बालभारती पाठय पुस्तकातील Qr कोड ई सहित्य निर्मिती साठी आदरणीय शिक्षणमंत्री विनोद तावडे साहेब यांच्या हस्ते सन्मान झाला आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जिल्हास्तरावर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी मॅडम यांच्या हस्ते मिळाले.

तंत्रज्ञानाची सोबत :

श्रीमती भामरे यांनी मालेगाव तालुक्यात पहिला महिला ब्लॉग निर्मिती करून महिलांना तंत्रज्ञान हाताळण्यासाठी प्रेरणा दिली. त्यानंतर त्यांनी youtube चॅनल, विद्यार्थ्यांसाठी सोपे व सहज हाताळता येणारे अँप तयार केले. महिलांना घरी बसल्या तंत्रज्ञान शिकता यावे म्हणून ऑनलाइन मार्गदर्शन सुरु केले. यात व्हिडिओनिर्मिती,ऑनलाइन टेस्ट , गुगल फॉर्म , पीपीटी ,फोटो कोलाज शिकवले व ज्यांनी त्यात यश मिळवले त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला.
ओन्ली ऍक्टिव्ह समूहाचे श्री सुदाम साळुंखे सर व करूणा गावंडे यांच्या मदतीने राज्यात पहिले महिला तंत्रस्नेही संमेलन आयोजित केले. महिलांचा सावित्रीच्या लेकी हा सन्मान देऊन गौरव केला. महिला शिक्षिकांचा राज्यस्तरीय सावित्रीच्या लेकी हा विशेषांक काढला. याची नोंद बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली तसेच तालुकास्तरीय महिला शिक्षिकांचा देखील गगनभरारी हा विशेषांक काढला हा राज्यात व जिल्ह्यात पहिलाच उपक्रम. यामुळे महिलांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळाले.

ताईंचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व :

वैशाली भामरे जीवन गौरव ह्या शैक्षणिक मासिकाच्या नाशिक जिल्ह्याच्या सह संपादक आहेत. यामुळे शिक्षकांना लिहिण्याची प्रेरणा त्यांनी दिली. दरवर्षी १४ नोव्हेंबर बाल दिनानिमित बालसाहित्य संमेलन व ५ जून पर्यावरण दिना निमित्त शिक्षक साहित्य संमेलन आयोजन त्या करत असतात. शिक्षकांना राज्यस्तरीय जीवन गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार, निबंध स्पर्धा, कथा काव्य स्पर्धा, अभंग स्पर्धांचे आयोजन ,अपघातग्रस्त मुलांना मदत, पूरग्रस्त सांगली येथील मुलांना दप्तर व लेखनसाहित्य पुरवले. भामरे या स्वतःही लेखन करतात .त्यांचे वैचारिक व शैक्षणिक लेख वर्तमानपत्र, मासिके यात प्रासिद्ध झाली आहेत. ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांच्या कवितेची निवड झाली होती. नुकताच पानिपतकार श्री विश्वास पाटील यांच्या हस्ते “लेखन क्षेत्रातील उभरते व्यक्तिमत्व” म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. नुकताच फिनलंड येथील Cce मार्फत आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर सादर केला. नॅशनल टिचर्स सायन्स काँग्रेस या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेसाठी त्यांच्या रिसर्च पेपर ची निवड झाली, तसेच राज्यस्तरावरही मराठी विज्ञान परिषद आयसर, पुणे येथे आयोजित परिषदेतही त्यांच्या रिसर्च पेपरची निवड झाली. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य अशा ठिकाणी शोधनिबंध सादर करणाऱ्या राज्यातील जि. प. शिक्षिका..विविध शैक्षणिक परिषदांमधूनही तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. राज्यस्तरीय स्पोकन इंग्लिश ट्रेनिंग, विभागस्तरीय मराठी, जिल्हास्तर मराठी , गणित, तंत्रज्ञान प्रशिक्षणात सहभाग व तज्ञ मार्गदर्शक, तालुक्यातील शिक्षकांना व आश्रमशाळा शिक्षकांना हि मार्गदर्शन केले आहे. पवित्र पोर्टल मार्फत भरती झालेल्या नवीन शिक्षकांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांशिक्षकांनाही मार्गदर्शन, जिल्हा परिषदेमार्फत आयोजित शिक्षणाचा कट्टा यातील सादरीकरण बघून आदरणीय शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी “चेंज मेकर” म्हणून गौरव केला.सामाजिक कार्यातही त्या भाग घेतात. मोसम नदी स्वच्छता सुशोभीकरण, तनिष्का मार्फत महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी, निराधार मुलांना दत्तक घेणे, शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात देणे, निर्भया स्मरणार्थ वृक्षारोपण आदी यापुढेही या सेवाव्रतातून मुलींच्या शिक्षणासाठी व महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करायचे आहेत. विद्यार्थी एक उत्तम माणूस म्हणून घडवायचे आहे. एक सुजाण नागरिक जो आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेल, अशी समाजाभिमुख, सुसंस्कारित पिढी घडवायची आहे.

परिचय :

श्रीमती वैशाली भामरे
जि. प .प्रा.शाळा माणके ता. मालेगाव, जि नाशिक

ताईंना मिळालेले पुरस्कार :

● विधायक संदेशातून विवेकी समाज घडविण्याच्या उद्देशाने आयोजित स्पर्धेतील यशासाठी आदरणीय मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सन्मान
● पाठयपुस्तकातील Qr कोड ई सहित्य निर्मिती साठी आदरणीय शिक्षणमंत्री विनोद तावडे साहेब यांच्या हस्ते सन्मान झाला आहे.
● जिल्हा परिषदेचाआदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला असून याआधीही अनेक संस्थांचे त्यांना पुरस्कार मिळाले आहेत.
● महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत तृतीय
● राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार – मागासवर्गीय शिक्षक संघटना यांच्याकडून
● राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार – जीवन गौरव मासिक यांच्याकडून
● नेशन बिल्डर अवॉर्ड इनरव्हील क्लब
● जिल्हास्तरीय किनो पुरस्कार किनो education संस्था
● कार्यगौरव पुरस्कार -ग्रामपंचायत व गावकरी
● आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार भारत विकास परिषद
● उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार शिक्षक समिती
● पुण्यनगरी गौरव पुरस्कार दैनिक पुण्यनगरी
● उत्कृष्ट कविता सादरीकरण – महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद पिंपरी चिंचवड
● राज्यस्तरीय सावित्रीच्या लेकी
● ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांच्या कवितेची निवड झाली होती. नुकताच पानिपतकार श्री विश्वास पाटील यांच्या हस्ते “लेखन क्षेत्रातील उभरते व्यक्तिमत्व” म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला.
● महाराष्ट्र Books of रेकॉर्ड सन्मान

शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा : पुष्प ६ वे – ‘ विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास ‘ हे ध्येय उराशी बाळगून मातेसमान विद्यार्थ्यांवर प्रेम करणाऱ्या, विद्यार्थ्यांना लिहतं करून विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलन भरवणाऱ्या, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांतून व्यक्त होण्याची सुवर्णसंधी देणाऱ्या आदर्श शिक्षिका श्रीमती अनिता जावळे, लातूर..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *